शुक्रवार दिनांक 4 नोव्हेंबर रोजी फलटण आणि खंडाळा,बारामती तालुक्यामध्ये दुपारी सव्वा दोन व रात्री 12 नंतर सलग तीन प्रचंड मोठे आवाज झाले. घरांच्या खिडक्या जोरजोरात आदळल्या. अनेकांना हा आवाज नेमका कशाचा आहे, हे समजले नाही. काहीजणांनी याला भूकंप असे देखील म्हटले. परंतु भूकंप होतो तेव्हा भूगर्भात हालचाल होते. आकाशात असा एवढा मोठा आवाज होत नाही. हा प्रकार थोडासा वेगळावअसून काल रात्री सव्वा सातच्या दरम्यान आकाशातून पूर्वेकडून पश्चिमेकडे जाणारा एक तेजस्वी गोळा दिसला. खूप कमी उंचीवरून तो गेला आणि उल्कापात झाल्यासारखा तो दिसत होता. अशाच घटना दोन अडीच महिन्यापूर्वी मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये सुद्धा झाल्या होत्या. प्रश्न हा की हे नेमके आगीचे गोळे कशाचे आणि हे आवाज कशाचा? मागील आठवड्यात 23 ऑक्टोबर 2022 रोजी मध्यरात्री भारतीय अवकाश संशोधन संस्था इस्त्रोने “वन वेब” या ब्रिटिश कंपनीचे 36 उपग्रह यशस्वीपणे अवकाशात प्रक्षेपित केले होते. हे सर्व उपग्रह पृथ्वीपासून 16,000 ते 20,000 किलोमीटर उंचीवरील कक्षेत स्थिर करण्यात यश मिळाले होते. अशा प्रकारे मोठ्या प्रमाणात उपग्रह वाहून नेणारी उपग्रह प्रक्षेपक वाहने त्यांच्या विविध कक्षातील इंधन जळाल्यानंतर त्यांना स्वतःपासून वेगळे करतात. सदर कक्षांचे अवशेष अवकाशात पृथ्वीभोवती फिरत राहतात. हळूहळू त्यांची कक्षा कमी कमी होते. अतिशय तप्त झालेले हे अवशेष जेव्हा पृथ्वीच्या वातावरणामध्ये प्रवेश करतात तेव्हा हवेतील ऑक्सिजनच्या संपर्कात आल्यामुळे ते पेट घेतात. कधीकधी अर्धवट जळालेली स्टेज अशा रीतीने पृथ्वीच्या वातावरणात प्रवेश करते तेव्हा तिचा प्रचंड मोठा स्फोट होऊन आवाज होतो. सध्या हे अवकाशीय कचरा पूर्वेकडून पश्चिमेकडे फलटण च्या आकाशातून जात असल्यामुळे फलटण आणि खंडाळा या दोन तालुक्यातील अनेक गावांना हा आवाज अनुभवता आला. अनेक घरांची दारे आणि खिडक्या जोरजोराने आदळल्या आणि कर्ण कर्कश आवाज निर्माण झाला. मला पूर्ण खात्री आहे की हा अवकाशातून आलेल्या अवकाशीय कचऱ्याचा स्फोट असावा. हा भूकंप वगैरे नसावा व असे आवाज अजून काही दिवस येत राहतील सागर जाधव संचालक दिशा अकॅडमी फलटण.