नवी मुंबई : विवाहित महिलेला मानसिक त्रास, शिवीगाळ, मारहाण केल्याप्रकरणी पती विशाल शेषराव शिंदे रा. भगतवाडी सुकापुर ता. पनवेल शेषराव शिंदे, रमल शेषराव शिंदे, भारती शेषराव शिंदे, जयश्री रितेश सावंत, रितेश काशिराम सावंत, आणि मोहिणी मकरंद निकुंष या सर्वांच्या विरोधात खांदेश्वर पोलीस स्टेशन मध्ये विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सविस्तर वृत्त असे की, संबंधीत महिलेचा विवाह ५/५/२०१५ रोजी विशाल शेषराव शिंदे यांच्याशी हिंदू धार्मिक पद्धतीने झाला होता. परंतु विवाहानंतर पती विशाल सह सासु सासरे नणंद आदींनी पीडितेला शिवीगाळ करणे, अपमानास्पद वागणूक देणे असे प्रकार सुरू झाले. तर सासरे शेषराव शिंदे यांनी तर पीडितेला लज्जा उत्पन्न होईल असे तीन ते चार वेळा प्रकार केले. याविषयी पीडित महिलेने पती विशाल यांना सांगितले होते. उलट सासु नणंद पीडित महिलेच्या विरुद्ध पती विशाल यास भडकवत होते. पीडित गरोदर असताना त्रास देणे अधिक काम सांगणे असे प्रकार सुरू होते. डॉक्टरांनी या काळात आराम करावयास सांगितले होते. परंतु या सर्वांच्या त्रासामुळे पीडितेच्या जुळ्या अपत्यापैकी एका अपत्याचा गर्भाशयातच मृत्यू झाला होता. तसेच आपल्या पतीचे बाहेर अनैतिक संबंध असल्याचे पीडितेला समजले होते या विरोधात महिलेने विचारणा केली असता पती विशाल यांनी तिला मारहाण केली होती.
पीडित महिलेच्या वडिलांची परिस्थिती बेताची असल्याने व आईवडील यांना त्रास नको म्हणून याची माहिती पीडितेने सांगितली नव्हती.
पीडित महिला चौथ्यांदा गर्भवती राहिली होती. त्यावेळी गर्भपात कर नाहीतर तुला सोडून देईन अशी धमकी दिली होती. त्याचबरोबर माहेर वरुन दहा लाख रुपये हुंडा आणावयास सांगितले होते. पैसे न दिल्यास माहेरी सोडण्याची धमकी दिली होती. अखेर या सर्वांच्या मानसिक शारिरीक छळ, मारहाण दमदाटी यांच्या विरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.






















