शनेश्वर जयंती निमित्त विविध मान्यवरांना पुरस्कार प्रदान
धर्मरक्षा पुरस्कार धंनजय देसाई,भूमिपुत्र पुरस्कार मंगेश धुमाळ यांना तसेच गोरक्षक आणि प्रगतशील शेतकरी पुरस्काराचे वितरण करण्यात आले.
पिंपोडे बुद्रुक ,प्रतिनिधी
श्री तीर्थक्षेत्र सोळा शिवलिंग शनैश्वर देवस्थान , सोळशी , ता कोरेगाव येथे दि . २८ ते ३० मे सलग तीन दिवस सुरू असलेला शनी जयंती सोहळा , स्वातंत्र्याचे अमृतमहोत्सवी वर्ष , हिंदू राष्ट्र बलशाली होण्यासाठी एक कोटी बेलार्पण , महारुदाभिषेक शिव लीलामृत पारायण , शनीमहात्म्य,पारायण , गोपूजन , धर्मध्वजारोहण , भजन , धार्मिक कार्यक्रम , त्यागेश्वर महाराजांचा भव्य पालखी मिरवणूक सोहळा , शनैश्वर कृतज्ञता पुरस्कार वितरण करण्यात आले.त्यावेळी बोलताना देसाई म्हणाले आपल्या देशाची संस्कृती आणि सभ्यता ही हिंदू राष्ट्र असणाऱ्या देशाचा सर्वश्रेष्ठ पाया आहे . तो अभिमान आणि बांधिलकी जपली पाहिजे असे मत हिंदू राष्ट्र सेनेचे प्रमुख धनंजय देसाई यांनी व्यक्त केले . यावेळी देवस्थानचे मठाधिपती शिवयोगी नंदगिरी महाराज , द्वारकेचे सूर्याचार्य कृष्णादेवनंद गिरीजी महाराज , महंतसुंदरगिरी शांतीगिरीजी महाराज , महंत शीतलगिरिजी महाराज , वडीयावीर ( गुजरात ) , पुसेगावचे सुंदरगिरी महाराज अनेक महंत , संत यांची प्रमुख उपस्थिती होती . या कार्यक्रमात धनंजय देसाई यांना धर्मरक्षा पुरस्कार समाजसेवेचा वसा घेतलेल्या मंगेश धुमाळ यांना देवस्थानने शनैश्वर कृतज्ञता भूमिपुत्र पुरस्कार शिवशंकर राजेंद्र स्वामी यांना गोरक्षा पुरस्कार , सोळशी येथील जालिंदर सोळस्कर यांना प्रगतशील शेतकरी पुरस्कार देऊन गौरवण्यात आले .देसाई म्हणाले , शिवयोगी नंदगिरी महाराज हे धर्माबरोबरच परोपकाराची कास धरून कार्य करीत आहेत . तावून सुलाखून निघालेल्या या महात्म्याच्या हातून आमचा सन्मान होणे हीच खूप मोठी गोष्ट आहे . देवस्थानचा हा कल्पवृक्ष असाच बहरत रहावा . मंगेश धुमाळ यांनी जिल्हा परिषदेचे कृषी व पशुसंवर्धन समितीच्या माध्यमातून जिल्ह्यात साजेसे काम करून आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे . तरुणांच्या हाताला काम देण्याचे काम त्यांच्याकडून होत आहे . आजच्यापुरस्काराने खऱ्या अर्थाने पुरस्कार विजेत्यांना काम करण्याची आणखी ऊर्जा निर्माण होईल असे देसाई म्हणाले . शिवयोगी नंदगिरी महाराज म्हणाले , समाजात खूप मोठा वर्ग चळवळीत काम करीत आहे . त्यांना शोधून कामाची पोहोच म्हणून दरवर्षी आपण पुरस्कार देत असतो .
मंगेश धुमाळ म्हणाले , उत्तर कोरेगावमधील प्रश्नांची सोडवणूक करत असतानाच जिल्हा परिषदेच्या माध्यमातून राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार व मान्यवरांनी जिल्हा परिषदेचे सभापतिपद देवून सन्मान केला . कोरोनाच्या संकटात कृषी , पशुसंवर्धन विभागाच्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी केली . शनैश्वर देवस्थान व नंदगिरी महाराज राबवत असलेल्या विविध उपक्रमांमुळे आपल्याला काम करण्याची प्रेरणा मिळते , असे धुमाळ म्हणाले . यावेळी महंत शांतिगिरीजी महाराज सुंदरगिरी महाराज यांनी मनोगत व्यक्त केले .. तीन दिवस चाललेल्या कार्यक्रमांना राजमाता कल्पनाराजे भोसले , खा . रणजितसिंह निंबाळकर , आ . महेश शिंदे , जिल्हा बँकेचे संचालक रामभाऊ लेंभे , विक्रम पावसकर , राजूशेठ लोढा , सिनेअभिनेते मोहन जोशी , आण्णा नाईक यांच्यासह मान्यवर उपस्थित होते . कार्यक्रमाचे सूत्रसंचालन साहेबराव होळ यांनी केले . ट्रस्टचे सचिव अविनाश धुमाळ यांनी आभार मानले धार्मिक सोहळा यशस्वी पार पाडण्यासाठी देवस्थानचे सेवेकरी मंडळ , शिष्यगण , भक्तगण यांनी परिश्रम घेतले .
धंनजय देसाई व मंगेश धुमाळ यांना पुरस्कार प्रदान करताना नंदगिरी महाराज,शांतिगिरी महाराज,कृष्णदेवनंद महाराज,सुंदरगिरी महाराज आणि मान्यवर