दहिवडी : ता.३०
माण तालुक्यातील एक तीर्थक्षेत्र म्हणून प्रसिद्ध असलेल्या गोंदवले बुद्रुक या ठिकाणी रामनवमी उत्साहात संपन्न झाली. ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांच्या पदस्पर्शाने आणि रहिवासाने पुनीत झालेली ही भूमी रामनामाने अगदी दुमदुमून गेली.गोंदवलेमधील श्रीराम मंदिरात रंगबेरंगी फुलांच्या आकर्षक कमानी रोषणाईने मंदिरामध्ये दुपारी श्रीरामाचा जयघोष झाला….. राम जन्मला ग.. सखी राम जन्माला… या गाण्यांवर महिलांनी चांगलाच ताल धरला होता.
सियावर रामचंद्र की जय!, पवनसुत हनुमान की जय!, प्रभू रामचंद्र भगवान की जय!,अशा जयघोषाने थोरले राम मंदिर व परिसर दुमदुमून गेला होता. किर्तन, भजन,आणि श्रीरामाच्या नामस्मनाने मंदिरातील वातावरण भारावून गेले होते. वेगवेगळ्या ठिकाणाहून लोकांसह गोंदवले परिसरातील भाविक भक्त व लोकांची प्रभू रामचंद्राच्या दर्शनासाठी थोरल्या राम मंदिरामध्ये दिवसभर वर्दळ सुरु होती.






















