सातारा, दि.३ फेब्रुवारी : एक फेब्रुवारी पासून येथील मेडिकल कॉलेजची ऑनलाइन पद्धतीने प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. एमबीबीएसच्या पहिल्या वर्षासाठी ऑनलाइन पद्धतीने प्रवेश प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. राज्याच्या वैद्यकीय शिक्षण विभागाकडून ऑनलाइन पद्धतीने ही प्रवेश प्रक्रिया राबवली जाणार असून पहिल्या वर्षासाठी एकूण १०० विद्यार्थ्यांना गुणवत्तेनुसार प्रवेश दिला जाणार आहे. या १०० विद्यार्थ्यांमध्ये महाराष्ट्रातील ८५ विद्यार्थी तर परराज्यातील १५ विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जाणार आहे. या सर्व विद्यार्थ्यांची गुणवत्तेनुसार यादी लावली जाणार आहे. मार्च २०२२ पासून प्रत्यक्ष मेडिकल कॉलेज सुरू होणार आहे. सातारा मेडिकल कॉलेजची प्रवेश प्रक्रिया सुरू झाल्याने तमाम सातारकरांच्यामध्ये आनंदाचे व उत्साहाचे वातावरण पसरले आहे. याबाबत अधिक माहिती अशी, तात्पुरत्या स्वरूपात जिल्हा रुग्णालय आणि एका खाजगी वैद्यकीय महाविद्यालयाच्या इमारतीत यावर्षी एमबीबीएसची पहिल्या वर्षाची बॅच सुरू केली जाणार आहे. त्यासाठी आयएमसी ची तपासणी पूर्ण होऊन त्यांनी प्रवेश प्रक्रिया घेण्यास हिरवा कंदील दिला आहे. त्यानुसार सर्व तयारी झाली आहे. त्यावरून मेडिकल कॉलेज एमबीबीएस अभ्यासक्रमासाठी पहिल्या वर्षीची प्रवेश प्रक्रिया मंगळवारपासून सुरू झाली आहे. मेडिकल कॉलेज कधी सुरू होणार याबाबतची सातारकरांची प्रतीक्षा आता संपली आहे. वैद्यकीय शिक्षण विभागाकडून ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया राबवली जात आहे. पहिल्या वर्षासाठी १०० विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जाणार आहे. यामध्ये महाराष्ट्रातील ८५ विद्यार्थी तर अन्य राज्यातील १५ विद्यार्थी घेतले जाणार आहेत. जे विद्यार्थी वैद्यकीय प्रवेश प्रक्रियेसाठी पात्र झालेले आहे, त्यांच्यातूनच या महाविद्यालयाचे शंभर विद्यार्थी निवडली जातील. त्यांची गुणवत्तेनुसार यादी लावली जाणार आहे. ही प्रवेश प्रक्रिया तीन फेऱ्यांमध्ये होणार आहे. त्यासाठी दि.१ ते ७ फेब्रुवारी महाराष्ट्रातील पात्र विद्यार्थ्यांची प्रवेश प्रक्रिया पूर्ण केली जाईल. तसेच दि. २ ते ७ फेब्रुवारी या दरम्यान परराज्यातील विद्यार्थ्यांची प्रवेश प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे. त्यानंतर दुसरी फेरी व आवश्यक भासल्यास तिसरी फेरी होणार आहे. सातारा मेडिकल कॉलेजची प्रत्यक्ष इमारत बांधणी पाटबंधारे विभागाकडून वैद्यकीय शिक्षण विभागाकडे हस्तांतरित केलेल्या ६० एकर जागेवर होणार आहे. फेब्रुवारी अखेर संपूर्ण प्रवेश प्रक्रिया पूर्ण केली जाणार असून मार्च २०२२ पासून प्रत्यक्ष मेडिकल कॉलेजच्या कामकाजाला सुरुवात केली जाणार असल्याची माहिती मेडिकल कॉलेजचे सूत्रांनी दिली. *** १ फेब्रुवारीपासून मेडिकल कॉलेजची प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. गुणवत्तेनुसार विद्यार्थ्यांची यादी लावली जाणार आहे. फेब्रुवारीअखेर ही प्रक्रिया पूर्ण करून मार्चमध्ये २०२२ मध्ये प्रत्यक्ष मेडिकल कॉलेजच्या कामकाजाला सुरुवात होणार आहे. सूत्र, सातारा मेडिकल कॉलेज. *** चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांचे भरतीला परवानगीसातारा मेडिकल कॉलेज सुरू होत असल्याने यासाठी लागणारे चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांची भरती करण्याची परवानगी वैद्यकीय महाविद्यालयाच्या व्यवस्थापनास दिली आहे. त्यानुसार बाह्यस्थ संस्थेच्या माध्यमातून टेंडर पद्धतीने ही भरती होणार आहे. यामध्ये पहिल्या वर्षासाठी मंजूर असलेल्या पाच ते सहा प्रकारच्या पदांचा समावेश असेल. त्यासाठी टेंडर काढण्याचे काम या आठवड्यात सुरू होणार आहे.