पूर्वी एक काळ असा होता की ज्याचा वर्तमानपत्राशी संबंध नाही, ज्यांचा बातमीशी संबंध नाही असे व्यक्तीसुध्दा वर्तमानपत्राला मदत करायचे. कारण निकोप समाजव्यवस्थेसाठी वर्तमानपत्र गरजेचे आहेत असं त्यांना वाटायचं. मात्र आता समाजातून ती भावना संपत चालली आहे. अशा परिस्थितीत वर्तमानपत्रांना देखील या क्षेत्राकडे व्यवसाय म्हणून पहावे लागेल. व्यावसायिक मानसिकता आणावी लागेल त्याशिवाय वर्तमानपत्र टिकणार नाहीत. या शब्दात महाराष्ट्रराज्य मराठी पत्रकार संघ, मुंबईचे प्रदेशाध्यक्ष वसंत मुंडे यांनी माध्यम क्षेत्रासमोरील आव्हानांना पर्याय सुचवले आहेत. मनोवेध मध्ये संजय मालाणी यांनी घेतलोली मुलाखत.
कोरोनानंतर प्रसार माध्यमांसमोर त्यातही मुद्रीत माध्यमांसमोर अनेक अडचणी निर्माण झाल्या आहेत. अनेक आव्हानांना सामोरे जाण्याची वेळ माध्यमांवर आली आहे. अशा परिस्थितीत माध्यमांनी काय केले पाहिजे या बाबत महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष वसंत मुंडे राज्यभरात पत्रकार, संपादक, वर्तमानपत्राचे मालक अशा सर्वांशी संवाद साधत आहेत आणि त्यातूनच त्यांनी स्वत:ची अशी काही भूमिका निश्चित केली आहे.
प्रश्न-आपण सध्या राज्यभरातून माहिती घेताय. मुद्रित माध्यमांमधलं नेमकं आर्थिक चित्र काय आहे?
वसंत मुंडे-कोरोनाच्या टाळेबंदीचा सर्वात मोठा फटका माध्यमांना बसलाय. त्यातही प्रिंट मिडियाला बसलाय. अर्थात कोरोनाच्या आगोदरपासूनच या क्षेत्रासमोर अनेक आव्हानं निर्माण व्हायला सुरूवात झाली होती. कोरोनाने ती वाढविली आहेत. मी प्रदेश अध्यक्ष या नात्याने 28 जिल्ह्यात या क्षेत्राशी संबंधीत वेगवेगळ्या घटकांशी संवाद साधलाय. त्यातून समोर आलेले चित्र अत्यंत भयानक आणि विदारक आहे. एका क्षणात ‘तुम्ही आता थांबा’ असा निरोप देऊन ज्यांचं काम थांबविलं गेलं अशा लोकांची या क्षेत्रातील व्यक्तींची संख्या 30 हजाराच्या आसपास आहे. आजही अनेकांपुढे उद्या आपलं काम सुरक्षित राहिल का हा प्रश्न आहे. पण हे प्रश्न मांडायचे कोणी? माशाचे अश्रू जसे दिसत नाहीत तसं माध्यम क्षेत्राचं आहे. त्यामुळे आता माध्यमांमधल्या लोकांच्या प्रश्नाकडे वळावं लागेल. माध्यम क्षेत्रांना, वर्तमानपत्रांना आर्थिक स्थैर्य मिळाल्याशिवाय हे क्षेत्र टिकाणार नाही.
प्रश्न-आपण म्हणताय अनेकांचा रोजगार गेला. खरोखरच मोठ्या वर्तमानपत्रांनासुध्दा हे गणित परवडत नाहीये का?
वसंत मुंडे-या प्रश्नाचं उत्तर माध्यमांनी आतापर्यंत जे अर्थकारण स्विकारलेलं आहे त्यात आहे. मुळात जगात कोठेच निर्मिती किंमतीपेक्षा कमी किमतीत उत्पादन विकायचे असा व्यवसाय नाही. आपलं वर्तमानपत्र हाच त्याला अपवाद आहे. वर्तमानपत्राच्या एका प्रतिचा निर्मिती खर्च 10 रूपये असतो आणि आपण ते 2-3 रूपयात घरपोच पोहोचवतो. असं कुठल्याच व्यवसायात होत नसतं. हा जो उत्पादन खर्च आणि विक्री किमतीतला फरक आहे तो जाहिरातीतून भरून काढायचं अर्थकारण वर्तमानपत्रांनी स्वीकारलं होतं मात्र आता जाहिरातीचाच ओघ कमी झालाय. कोरोनामुळं व्यवसाय उद्योग बंद आहेत. ते जाहिराती कोठून देणार. या टाळेबंदीनं हातावर पोट असणाराचे हाल झाले असं आपण नेहमी मांडतो पण खर्या अर्थानं वर्तमानपत्राचं पोट देखील हातावर आहे. त्यांच्याकडे येणारा जाहिरातीचा ओघ कमी झालाय त्यामुळं सगळंच अर्थकारण कोलमडलंय आणि यामुळेच छोटी काय, मोठी काय सारीच वर्तमानपत्र अडचणीत आलीत.
प्रश्न-मग आता अशा परिस्थितीत नेमकं काय केलं पाहिजे असं तुम्हाला वाटतं? नेमकं काय बदलावं लागेल?
वसंत मुंडे-वर्तमानपत्रांना आपलं अर्थकारण बदलावं लागेल. यापूर्वी जे अर्थकारण स्वीकारलं होतं ते चुकीचं होतं असं नाही. त्या त्या काळात ते योग्य होतं. पूर्वीच्या काळात वर्तमानपत्रांची उद्दिष्ट वेगळी होती. समाजाची वर्तमान पत्रांकडे पाहण्याची दृष्टी वेगही होती. जागतिकी करणानंतर सर्वच क्षेत्रांचं स्वरूप बदलतंय. वर्तमानपत्राचंही बदललं. नवीन तंत्रज्ञान आलं. वर्तमानपत्र रंगीत झाली. त्याच्या निर्मिती किंमतीत फरक पडला पण वर्तमानपत्रांची विक्री किंमत बदलली नाही. वर्तमानपत्र सर्वांना परवडेल असं असावं. या दृष्टिकोनातून किंमत कमी ठेवायची ही एक मानसिकता होती. त्यातून किंमतीच वाढल्या नाहीत. सगळ्या गोष्टींचे दर वाढले. एक रूपयाचा चहा दहा रूपयांवर गेला. पण वर्तमानपत्र मात्र आपली किंमत वाढवायला तयार नाहीत हे बदलावं लागेल.
प्रश्न-काही गरजेच्या आणि काही चैनीच्या गोष्टींचे दर वाढले हे मान्य मग वर्तमानपत्रांना आपण याच रांगेत बसवणार आहोत का?
वसंत मुंडे-हा दृष्टिकोनाचा विषय आहे. प्रत्येकजण याकडे कसा पाहतो हे महत्वाचं. चैन का गरज यापेक्षाही वर्तमानपत्र चाललं, टिकलं तरच काही करता येईल हे आता लक्षात घ्यावं लागेल.वर्तमानपत्राची गरज समाजाला असतेच. स्थानिक व्यवस्थेवर, राज्य व्यवस्थेवर वर्तमानपत्राचा अंकुश आवश्यक असतो. म्हणूनच आता वर्तमानपत्र हीच सर्वात गरजेची गोष्ट आहे अशी भूमिका घेणे गरजेचे आहे त्यासाठी पारंपारिक विचारसरणी कोठेतरी सैल करावी लागेल.
प्रश्न-वर्तमानपत्राच्या किंमती वाढविल्या तर मागणी कमी होणार नाही का?
वसंत मुंडे-हे पहा, ज्ञानाची आणि माहितीची किंमतच होऊ शकत नाही. माध्यमं जेंव्हा सरकारला शिक्षणावर किती खर्च करावा हे सांगतात त्यामागे या समाजाला शिक्षणाची गरज आहे हीच भावना असते. आता तसाच दृष्टीकोन वर्तमानपत्रांबद्दल ठेवावा लागेल. ज्ञानाची आणि माहितीची गरज भागविण्याची वर्तमानपत्र ही एक खिडकी आहेत. आणि लोकशाही व्यवस्था टिकवायची असेल तर वर्तमानपत्र टिकली पाहिजेत हे पटवून द्यावे लागेल. आणि मला आतापर्यंततरी कोणत्याच वाचकाने किंमत वाढली तर वर्तमानपत्र परवडणार नाही असं म्हटलं नाही. म्हणूनच आपल्याला किंमत वाढविण्याबद्दल गांभीर्याने विचार करावा लागेल.कारण मुळात प्रिंट मिडिया टिकवायचा का नाही याच प्रश्नाचं उत्तर शोधण्याची आता वेळ आली आहे. वर्तमानपत्र, स्थानिक वर्तमानपत्र संपली तर स्थानिक सत्ता निरंकुश होतील. स्थानिक व्यवस्थेला प्रश्न कोण विचारेल. वर्तमानपत्र हा सामान्यांचा आवाज असतो तो टिकवायचा का नाही याचा विचार करावा लागणार आहे.
प्रश्न-ज्या ज्या वेळी माध्यमामध्ये नवीन काही आलं त्यावेळी काहीही झालं तरी प्रिंट मिडियाला काही होत नाही असा सूर मुद्रित माध्यमांनी लावला. ही माध्यमांची आत्ममग्नता आहे की अतीविश्वास?
वसंत मुंडे-मुळात माध्यमांच्या क्षेत्रात सगळ्या प्रकारचे लोक आले. राजकारणी आले, उद्योगपती आले त्यांनी आपआपली वर्तमानपत्र काढली. त्यातून स्वत:चे फायदे करून घेतले पण या क्षेत्रासाठी या व्यवस्थेसाठी काय केलं. आजही वर्तमानपत्रांना, पत्रकार अगदी संपादकांना देखील जाहिरातदाराचं मांडलीकत्व स्वीकारावं लागतं अशीच व्यवस्था आजही आहे. ती व्यवस्था बदलण्यासाठी काहीच प्रयत्न झाले नाही. म्हणूनच मुद्रित माध्यमांना काही फरक पडणार नाही या आत्ममग्नतेतून आता बाहेर पडावं लागणार आहे.
जाहिरात दार कमी होतायत, सरकार मदत करणं तर दूर वर्तमानपत्रांबद्दल सहानुभूती दाखवायला तयार नाही. अशा परिस्थितीत वर्तमानपत्रांनाच आपले मार्ग निवडावे लागतील.
प्रश्न-एकीकडं डिजिटल आणि इलेक्ट्रॉनिक मिडिया अत्यंत कमी किमतीत माहिती देत असताना किंमत वाढवून ग्राहक टिकविण्यासाठी काय करावं लागेल?
वसंत मुंडे-किंमत वाढविल्यानंतरही ग्राहक टिकवायचे असतील तर वर्तमानपत्रांना आपली गुणवत्ता आणि वेगळेपण दाखवावं लागेल. 10 रूपये किंमत मोजली तर ग्राहक तुमच्याकडे वेगळे काय आहे हे विचारेल. ज्याच्याकडे चांगलं आहे त्याच्याकडेच ग्राहक वाढतील. आता वर्तमानपत्रातील लोकांनी बातमीवर खर्च केला पाहिजे. ती मानसिकता निर्माण करावी लागेल. ते वेगळेपण निर्माण करावं लागेल.
प्रश्न-समाजाची अभिरूची कधीच एक समान नसते मग अशा परिस्थितीत वेगळेपण, व्यावसायिकता, तत्व आणि सामाजिक अभिरूची याची सांगड कशी घालायची?
वसंत मुंडे- हे पहा सामाजिक अभिरूची तुम्ही आम्ही ठरवितो. आपण वर्तमानपत्रवाले ठरवितो. लोकांना काय आवडतं हे आपण ठरवायचा प्रयत्न करतो. आपण म्हणतो लोकांना क्राईमस्टोरी आवडते. खरंच ती आवडत असते का? आपल्याला आपल्या घरात क्राईमस्टोरी वाचायला आवडतं का? अमुक अमुक लोकांना आवडतं हे आपण लोकांना म्हणतो. मुळात कोणतीही अभिरूची निर्माण करावी लागते. वर्तमानपत्र चालवणं हा व्यवसाय आहे हे एकदा मान्य करावं लागेल. आणि मग त्याकडे व्यवसाय म्हणून पाहिलं तरच समाज टिकेल. आपण जे समाज समाज म्हणतो ना ती देखील सोयीची व्यवस्था आहे. समाज देखील आपल्या सोयीने सगळं पहात असतो. ज्यावेळी केवळ तत्वाचा विचार करून हे समाजाला चालेल का असं आपण म्हणतो त्यावेळी समाज वर्तमानपत्रांसाठी काय करतो. तत्त्वावंर आधारित वर्तमाननपत्र बंद का पडली? ज्या वेळी पत्रकारांना अडचणी येतात त्यावेळी समाज काय करतो. अनेक पत्रकारांना राहायला घरं नाहीत. पत्रकारांच्या मृत्यूनंतर त्यांची कुटुंब उघड्यावर पडतात त्यांच्यासाठी समाज काय करतो याचा देखील विचार करावा लागेल. आणि यातूनच या क्षेत्राला आत्मनिर्भर व्हावं लागेल. स्वत:च स्वत:च्या सक्षमतेचे मार्ग शोधावे लागतील.
प्रश्न-माध्यमं आणि समाज यातील दरी वाढती आहे का?
वसंत मुंडे-निश्चितपणे. वाढतेय म्हणण्यापेक्षा फार मोठी दरी पडलीय. पूर्वी एक काळ असा होता की ज्याचा वर्तमानपत्राशी संबंध नाही, ज्यांचा बातमीशी संबंध नाही असे व्यक्तीसुध्दा वर्तमानपत्राला मदत करायचे. कारण निकोप समाजव्यवस्थेसाठी वर्तमानपत्र गरजेचे आहेत असं त्यांना वाटायचं. मात्र आता समाजातून ती भावना संपत चालली आहे. अशा परिस्थितीत वर्तमानपत्रांना देखील या क्षेत्राकडे व्यवसाय म्हणून पहावे लागेल. व्यावसायिक मानसिकता आणावी लागेल त्याशिवाय वर्तमानपत्र टिकणार नाहीत.






















