उंब्रज:वार्ताहर
राज्याच्या कानाकोपऱ्यातून हजारो भाविक रथयात्रेच्या सोहळ्यामध्ये सहभागी झाले होते.मंदिरामध्ये पहाटेपासूनच उत्सवातील धार्मिक विधी होऊन सकाळी साडेपाचला कीर्तनाला सुरुवात झाली.यावेळी प्रभू श्रीरामाची पट्टाभिषित मूर्ती पालखीतून वाजतगाजत मंदिरासमोरील सजवलेल्या रथामधील विमानात ठेवली.नवमी उत्सवाचे गादीचे अधिकारी समर्थ वंशज दुर्गाप्रसाद अयोध्या नाथ स्वामी यांच्या हस्ते रथाच्या चारही चाकावर नारळ वाढवून उत्सवातील मानकरींना मानाचा नारळ देण्यात आला.रथाचे मानकरी साळुंखे बंधू यांच्या उपस्थितीत हजारोंच्या साक्षीने गुलाल खोबऱ्याच्या उधळणीत व श्रीराम नामाच्या जयघोषात ऐतिहासिक रथ यात्रेला सुरुवात झाली.प्रत्येकाच्या मुखात सीता रामचंद्र की जय,राजा रामचंद्र की जय चा जयघोष होता , जमलेले हजारो रामभक्त प्रभू श्रीरामाच्या घोषणा देऊन एकमेकांना गुलाल लाऊन जय श्रीराम म्हणत होते.श्री रामाची रथ यात्रा मंदिराच्या पायऱ्या पासून सुरू होऊन बस स्थानका शेजारील महारुद्र स्वामींच्या समाधी मंदिरापर्यंत जाऊन पुन्हा मंदिराकडे परत आली. रथामधील श्रीरामाची मूर्ती पुन्हा पालखी मध्ये ठेऊन वाजत गाजत मंदिरात आल्यावर स्वामी घराण्यातील पाच सुहासिनी महिलांनी मूर्तीस ओवाळण्यात आले.स्वामींच्या हस्ते उत्सवातील सर्व मानकऱ्याना व सेवकांना बिदागी व श्रीफळ देऊन उत्सवाची सांगता करण्यात आली.उत्सवासाठी श्री राम देवस्थान ट्रस्टचे सर्व पदाधिकारी व व्यवस्थापक बा. मा.सुतार, ग्रामपंचायतीचे पदाधिकारी आणि यात्रा कमिटि सर्वानी मिळून नियोजनबद्ध यात्रा पार पाडली.






















