यात्रा कमिटीच्या ढिसाळ कारभारामुळे झालेल्या वाहतूक कोंडीने घेतला दोन भाविकांचा जीव
दहिवडी : ता.०३
शिखर शिंगणापूर येथील यात्रेत झालेल्या वाहतूक कोंडीमुळे दोन भाविकांना आपला जीव गमवावा लागल्याची दुर्दैवी घटना शिंगणापूरमध्ये घडली. यात्रा कमिटीच्या ढिसाळ कारभाराने दोन भाविकांना आपला जीव गमवावा लागला.
घटनास्थळावरून मिळालेल्या प्राथमिक माहितीच्या आधारे कावडीसोबत मुंगी घाटातून चालत आल्याने धाप लागली म्हणून जास्त पाणी पिल्याने ३८ वर्षीय युवक जागीच कोसळला, तर ६५ वर्षीय वृद्ध व्यक्ती जास्त अंतर चालल्याने त्यांनाही धाप लागली होती. यातच त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आल्याने ते जागीच कोसळले.
यात्रेत आरोग्य यंत्रणा उपलब्ध असल्याने दोघांना दोन रुग्णवाहिकेमध्ये घेऊन जात असताना यावर्षी प्रशासनाची डोकेदुखी ठरलेल्या वाहतूक कोंडीमुळे रुग्णवाहिका योग्य वेळेत रुग्णालयात पोहचू शकल्या नाहीत. त्यामुळे दहिवडी येथे पोहचल्यानंतर एकास तर फलटण येथे पोहचल्यानंतर दुसऱ्या व्यक्तीस मृत घोषित करण्यात आले.
यात्रा कमिटीने योग्य नियोजन न केल्याने निर्माण झालेल्या वाहतूक कोंडीमुळे दोन भाविकांना आपला जीव गमवावा लागल्याची दुर्दैवी घटना घडली. कावडी मुंगी घाटातून वर चढवत असताना १३ भाविक ट्रेकर्स जखमी झाल्याने यात्रा उत्सवाला आधीच गालबोट लागले होते. त्यात भर म्हणून ओसरत्या यात्रेतही असलेल्या वाहतूक कोंडीने वेळेत उपचार न मिळू शकल्याने दोन भाविकांना आपला जीव गमवावा लागल्याने यात्रा कमिटीच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
देवाच्या भेटीला आलेल्या दोन भाविकांना यात्रा कमिटीच्या ढिसाळ कारभारामुळे मृत होऊन देवाकडे जावे लागल्याने भाविक, यात्रेकरू,ग्रामस्थ व परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.