दहिवडीत कर्मवीर आले उजेडात
दहिवडी : दहिवडी येथील कर्मवीर भाऊराव पाटील यांचा मध्यवर्ती ठिकाणी असलेला पुतळा हा बसवल्यापासून अंधारात होता. याविषयी महाराष्ट्र न्यूजच्या वतीने बातमी लावण्यात आली होती. त्याच बातमीची दखल दहिवडीतील रयत संकुलाच्यावतीने घेण्यात आली असून कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या पुतळ्याच्या ठिकाणी दिवाबत्तीची सोय करण्यात आली आहे. बातमी लागल्यानंतर दहिवडी येथील रयत संकुलाच्या वतीने महावितरणशी तात्काळ पत्रव्यवहार करत या ठिकाणी दिवाबत्तीची सोय करण्याविषयी पाऊले उचलली होती.
अवघ्या लोकांसाठी आपलं आयुष्य वेचणाऱ्या रयत शिक्षण संस्थेच्या डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या पुतळ्याबाबत संबंधित विभाग आणि प्रशासन आजपर्यंत उदासीन होते.मात्र बातमीच्या माध्यमातून वस्तुस्थिती लक्षात आणून दिल्यानंतर संबंधितांची उदासीनता संपली आहे. त्यामुळे दिवाबत्तीची सोय करण्यात आली आहे.
दहिवडी येथील कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या पुतळ्याच्या सुशोभिकरणासाठी रयत शिक्षण संस्थेकडून सुमारे १० लाख रुपयांच्या निधीची तरतूद करण्यात येणार आहे. त्यामुळे या ठिकाणाला अधिकच सुंदरता प्राप्त होणार आहे. येथील दुर्लक्षित बाजू आमच्या लक्षात आणून दिल्याबद्दल महाराष्ट्र न्यूजला आम्ही धन्यवाद देतो.
-डॉ.सुरेश साळुंखे. प्राचार्य, दहिवडी कॉलेज दहिवडी.