| कराड : प्रतिनिधी खासदार श्रीनिवास पाटील यांच्या मागणीनुसार कोयना धरण परिसरातील गावांना आरोग्य सेवा पुरविण्यासाठी सर्व सुविधांनीयुक्त स्पीडबोट ॲम्बुलन्स व इतर आरोग्य विषयक सोयीसुविधांसाठी केंद्रीय आरोग्य राज्यमंत्र्यांनी मान्यता दिली आहे. केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ.भारती पवार यांनी तशी माहिती खा.श्रीनिवास पाटील यांना पत्राद्वारे कळवली असून त्यामुळे अनेक दिवसापासूनच्या प्रलंबित मागणीला अखेर यश आले आहे. सातारा जिल्ह्यातील पाटण, जावळी, महाबळेश्वर या तीन तालुक्याच्या कोयना धरण परिसरातील गावांना आरोग्याची उत्तम सोय मिळावी यासाठी मागील अनेक वर्षांपासून तसे प्रयत्न सुरू आहेत. दुर्गम भागातील लोकांच्या आरोग्यविषयक समस्या सुटाव्यात त्यासाठी खा.श्रीनिवास पाटील यांच्याकडून सातत्याने प्रयत्न सुरू होते. त्यानुसार त्यांनी केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री यांच्याकडे पत्रव्यवहार करून व प्रसंगी भेट घेऊन पाठपुरावा केला होता. केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ.भारती पवार यांनी कोयना धरणाच्या शिवसागर जलाशयात स्पीडबोट ॲम्बुलन्स खरेदी करण्यासाठी व इतर आरोग्यविषयक सोयीसुविधांसाठी मान्यता दिली असून त्यासाठी सुमारे एक कोटीचा निधी मंजूर केला आहे. या निधीचा उपयोग स्पीडबोट ॲम्बुलन्स, वैद्यकीय उपकरणे व औषधे खरेदी करता येणार आहेत. तसेच त्यांची देखभाल दुरूस्ती व लागणारे कर्मचारी यांच्या पगाराची तरतूद देखील करण्यात आली आहे. तशी माहिती मंत्री डॉ.भारती पवार यांनी खा.श्रीनिवास पाटील यांना पत्राद्वारे कळवली आहे. अत्याधुनिक आरोग्य यंत्रणेसह स्पीडबोट खरेदी करता येणार अल्यामुळे जलाशयातील दोन्हीबाजूच्या तीरावर वसलेल्या जवळपास साठ गावांना मदत होणार आहे. सदर गावातील आरोग्यविषयक समस्या किंवा एखादी तातडीची गरज उद्भवल्यास या स्पीडबोटचा वापर करून त्यांना आरोग्याच्या उत्तम सोयीसुविधा असलेल्या सातारा, महाबळेश्वर, पाटण या ठिकाणी लवकर पोहचण्यासाठी मदतीचे होणार आहे. कोयना धरणाच्या शिवसागर जलाशयाच्या मध्ये दोन्ही तीरावर तापोळा, अहिर, रुळे, गावडोशी, आवळण, आमशी, हरचंदी, कळंब, वेळापूर, पाली, कोट्रोशी, खरोशी, शिरनार, देवळी, झांजवड, दाभेमोहन, दाभे, दुधगांव, तेटली, निपाणी, फुरुस, वाकी, रामेघर, वारसोळीदेव, गोगवे, लाखवड, देवसरे, येर्णे, खांबिलदरे, तांब, आखणी, कुसापूर, निवळी, रवंदी, आडोशी, माडोशी, शिंदी, शेंबडी, वाघळी, लामज, कांदाट, वाघावळे, खिरकंडी, चकदेव, मोरणी, वलवन, काकोशी, वासोटा, अंबवडे, कारगाव, कालेवाडी, पिसाणी, ढेंन, मायणी, तळदेव, वनकुसवडे, अशी दुर्गम, डोंगराळ व अतिवृष्टी भागात जवळपास साठ गावे वसलेली आहेत. त्या गावातील नागरिकांना या स्पीडबोटची निकडीची मदत होणार आहे. दुर्गम आणि डोंगरी भागात वास्तव्यास असलेल्या सदर गावच्या नागरिकांना आरोग्यविषयक अडचणीच्या काळात स्पीडबोटच्या माध्यमातून इतर ठिकाणी जाण्यासाठी निश्चितच सोयीचे होणार आहे. त्यामुळे आरोग्यसेवा सुधारणार असल्याने स्थानिक ग्रामस्थांनी खा.श्रीनिवास पाटील यांचे आभार मानले आहेत. तर जिल्ह्यात चांगल्या आरोग्यविषयक सेवा उपलब्ध व्हाव्यात यासाठी केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ.भारती पवार यांनी हा निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल खा.पाटील यांनी त्यांना धन्यवाद दिले आहेत. | |