कुकुडवाड खिंडीच्या वरच्या टेकडीला दोन बिबट्यांचा वावर?, सकाळी साडेसहाच्या सुमारास बिबट्या दिसल्याची परिसरात चर्चा
दहिवडी : ता.०८
माण तालुक्यात आज सकाळी साडे सहा वाजण्याच्या सुमारास कुकुडवाड परिसरात बिबट्याचे दर्शन झाल्याची मोठी चर्चा परिसरात रंगली आहे. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार ढाकणी गावचे अक्षय शिंदे हे पवनचक्की असलेल्या भागात सकाळी लवकर कामानिमित्त गेले होते. त्यावेळी त्यांना कुकुडवाडच्या खिंडीच्या वरच्या बाजूला असलेल्या टेकडीजवळ दोन बिबट्या आढळून आल्याची माहिती मिळत आहे. याबाबत त्यांनी स्वत: त्या बिबट्यांचा व्हिडिओ चित्रित केल्याचीही प्राथमिक माहिती मिळत आहे.
आजपर्यंत माण तालुक्यात कधीही बिबट्या हा प्राणी आढळून आला नाही. मात्र सोमवारी सकाळी साडे सहाच्या सुमारास बिबट्या आढळून आल्याचा दावा केला जात असल्याने वनविभागाने या गोष्टीला गांभीर्याने घ्यावे, त्याचबरोबर शहानिशा करावी,अशी मागणी परिसरातून होताना दिसत आहे.
माण तालुक्याच्या डोंगराळ भागात सहसा ससे, खोकड, कोल्हा, लांडगा, तरस इत्यादी प्राणी आढळतात तर काही भागात हरणे ही आढळतात. दीड वर्षापूर्वी या भागात दुर्मिळ असणाऱ्या सांबर या प्राण्याचेही दर्शन असेच गोंदवले परिसरात झाले होते.मानवाने जंगलतोड करून जंगली प्राण्यांचे अधिवास नष्ट केल्याने असे प्राणी वाट दिसेल तिकडे भटकत असतात. बऱ्याचदा ते पोटाची भूक भागवण्यासाठी मानवी वस्तीवर हल्ला करत असल्याची अनेक उदाहरणे सर्वांना माहीत आहेत. त्यामुळे आपल्या अधिवासापासून निष्कासित झालेला बिबट्या हा प्राणी माण तालुक्याच्या डोंगराळ भागात वाट चुकून आला असेल तर नवल वाटायला नको!
वनविभागाने या गोष्टीकडे गांभीर्याने घेऊन सदर ठिकाणी जावून पंचनामे करून नागरिकांच्या मनात निर्माण झालेली भीती दूर करावी,अशी मागणी होत आहे.






















