पुणे , 07 एप्रिल 24
आंतरराष्ट्रीय योग दिवसाला 75 दिवस बाकी असताना त्याची उलटगणना सुरू करण्याच्या सोहळ्यानिमित्त पुण्यामध्ये वाडिया महाविद्यालयाच्या क्रीडांगणात आयोजित केलेल्या योग महोत्सवाला योगप्रेमींनी प्रचंड मोठा प्रतिसाद दिला. भारत सरकारच्या आयुष मंत्रालयाची राष्ट्रीय निसर्गोपचार संस्था आणि मोरारजी देसाई राष्ट्रीय योग संस्था यांनी संयुक्तपणे या महोत्सवाचे आयोजन केले होते. 7 एप्रिल रोजी पहाटे 6 वाजता सुरू झालेल्या कॉमन योगा प्रोटोकॉल (CYP) च्या सरावात हजारो योगप्रेमींनी सक्रीय सहभाग घेतला. उत्साह आणि सहभागाच्या या उल्लेखनीय प्रदर्शनातून वैयक्तिक आणि सामाजिक कल्याणासाठी योगाभ्यासाचे वाढते महत्त्व अधोरेखित होत झाले . या कार्यक्रमाला विश्वास मंडलिक, अध्यक्ष, योग विद्या गुरुकुल, नाशिक, प्रतिष्ठित योगगुरू, विजयालक्ष्मी भारद्वाज, संचालक, आयुष मंत्रालय, डॉ. सत्यलक्ष्मी, संचालक, राष्ट्रीय निसर्गोपचार संस्था, पुणे आणि वैद्य डॉ. काशिनाथ समागंडी, MDNIY चे संचालक उपस्थित होते. त्यांच्या सहभागामुळे योगशास्त्राला प्रोत्साहन देण्याची आणि व्यक्ती आणि समाजाच्या कल्याणासाठी प्रयत्न करण्याची बांधिलकी प्रदर्शित होऊन या कार्यक्रमाची शोभा आणखी वृद्धिंगत झाली.
आयुष मंत्रालय, राज्य सरकारचे वरिष्ठ अधिकारी, अनेक मान्यवर आणि तज्ञ या कार्यक्रमाला उपस्थित होते.
यावेळी बोलताना , आयुष मंत्रालयाचे उपमहासंचालक सत्यजित पॉल म्हणाले, अतिशय निसर्गरम्य वातावरणात या अद्भुत योग महोत्सवाचे आयोजन पुण्यात होत आहे ही अतिशय आनंदाची आणि अभिनंदनाची बाब आहे. निरोगी आणि अधिक चांगल्या भविष्यासाठी योगसाधना ही एक जागतिक चळवळ आहे. यावेळी त्यांनी उपस्थितांनी इतक्या मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिल्याबद्दल त्यांची प्रशंसा केली आणि त्यांचे अभिनंदन केले.
आंतरराष्ट्रीय योग दिन-2024 हा दहावा आंतरराष्ट्रीय योग दिन आहे. यापूर्वीच्या वर्षांमध्ये झालेल्या कार्यक्रमांच्या आधारावर योग महोत्सव 2024 योगसाधनेच्या पुनरुत्थान सोहळ्याचे प्रतिनिधित्व करत असून या अंतर्गत उलट गणनेच्या अनेक कार्यक्रमांचा समावेश आहे.
योगविद्या गुरुकुल, नाशिक चे अध्यक्ष विश्वास मंडलिक यावेळी बोलताना म्हणाले, की योगसाधना ही भारताच्या समृद्ध वारशाची एक अद्भुत देणगी आहे जिने संपूर्ण जगाला निरोगी स्थान बनवण्यासाठी अनेक लाभ दिले आहेत. मुळामध्ये योग म्हणजे एक आध्यात्मिक शिस्तबद्धता आहे जी मन आणि शरीर यामध्ये सुसंवाद निर्माण करणाऱ्या सूक्ष्म विज्ञानावर आधारित आहे.
योगसाधनेचा अंगिकार करून व्यक्ती निरोगी, आनंदी आणि अधिक परिपूर्ण जीवन जगण्याच्या त्याच्या क्षमतेचा पुरेपूर वापर करून आत्म-सुधारणेच्या प्रवासाचा प्रारंभ करते.
आजच्या भव्य कार्यक्रमात सामाईक योग शिष्टाचाराला मोठ्या प्रमाणावर महत्त्व देण्यात आले. मान्यवरांच्या भाषणानंतर मोरारजी देसाई राष्ट्रीय योग संस्थेच्या योगतज्ञांकडून संस्थेच्या संचालकांच्या नेतृत्वाखाली योगसाधनेची प्रात्यक्षिके सादर करण्यात आली, ज्यामध्ये 5000 पेक्षा जास्त योग साधकांना सामाईक योग शिष्टाचाराचे सादरीकरण केले. या कार्यक्रमाचे आयुष मंत्रालय, एमडीएनआयवाय आणि इतर योग संस्थांच्या विविध समाज माध्यमांद्वारे थेट प्रसारण करण्यात आले. भारतीय योग संस्थेने त्यांच्या महाराष्ट्र शाखेसोबत आंतरराष्ट्रीय योग दिवस-2024 च्या 75व्या दिवसाला देखील पाठबळ दिले.