वरकुटे मलवडीत कार्यकर्त्यांची अभय जगताप यांच्याकडे मागणी
दहिवडी : ता.१२
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार या पक्षाचा निष्ठावंत कार्यकर्ता असणाऱ्या अभय जगताप यांना शरद पवार यांनी तिकीट द्यायलाच पाहिजे. शरद पवार साहेबांनी तिकीट दिलं नाही तर दादा तुम्ही अपक्ष का होईना पण लढा, अशी ठाम मागणी अभय जगताप यांच्या कार्यकर्त्यांनी केली. वरकुटे मलवडी येथे अभय जगताप यांना उमेदवारी मिळावी आणि नाही मिळाली तर अपक्ष लढायचे का? हे कोडे सोडवण्यासाठी कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता.
यावेळी अभय जगताप यांना उमेदवारी मिळालीच पाहिजे, अशी ठाम भूमिका कार्यकर्त्यांनी घेतली. यावेळी माढा, करमाळा, सांगोला, माळशिरस, माण- खटाव ,फलटण तालुक्यातील कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते.
अभय जगताप हे माढा लोकसभा मतदार संघात पायाला भिंगरी बांधल्यासारखे फिरत आहेत. अभय जगताप हे शरद पवार यांच्याशी एकनिष्ठ व्यक्तिमत्व आहे.
सर्वजण पक्ष सोडून जात असताना अभय जगताप यांनी पवार साहेबांचा खांदा भक्कम करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे अभय जगताप यांच्या निष्ठेला किंमत देऊन त्यांना माढ्याची उमेदवारी मिळालीच पाहिजे.
सध्या माढा मतदार संघात येऊन दुसरं कुणी पण उमेदवारी मागत आहे. मात्र हा पक्ष निष्ठवंतांचा पक्ष आहे. त्यामुळे माढा लोकसभा मतदार संघातून निष्ठावंत असणाऱ्या अभय जगताप यांना संधी मिळावी,त्यांना डावलू नये. अशी मागणी या कार्यकर्ता मेळाव्यात कार्यकर्त्यांनी केली.
तसेच अभय जगताप हे अभ्यासू व्यक्तिमत्व आहे. अभय दादा तुम्ही काही झालं तरी माघार घ्यायची नाही. शरद पवारांनी तिकीट दिलं नाही तर अपक्ष का होईना, पण तुम्ही लढा. आम्ही तुमच्या सोबत आहे. त्याचबरोबर रणजित निंबाळकर यांच्या विरोधात माढा लोकसभा मतदार संघात दगड जरी उभा केला तरी तो निवडून येईल. सत्ताधारी पक्षाविरोधात लोकांमध्ये तीव्र नाराजी आहे. त्यामुळे अभयदादा तुम्ही लढण्याचा निर्णय घ्या. उलटसुलट झालं तर अपक्ष लढा नाहीतर वंचित मधून लढा, पवार साहेबांचा पक्ष माढा मतदार संघात अभय जगताप यांनी जिवंत ठेवण्याचं काम केलं, पक्षाची मजबूत बांधणी केली आहे. त्यामुळे पवार साहेबांनी अभय जगतापांना तिकीट द्यायलाच पाहिजे, अभय जगताप यांच्यावर शरद पवार यांनी अन्याय करू नये. अशी ठाम भूमिका कार्यकर्त्यांनी मांडली. त्यामुळे कार्यकर्त्यांच्या मागणीनुसार आणि आग्रहानुसार अभय जगताप शरद पवारांनी तिकीट दिलं नाही तर बंड करून अपक्ष लढण्याची भूमिका घेणार का? हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.
चौकट :
अभयदादांना उमेदवारी मिळाली नाही तर,प्रसंगी पदाचा राजीनामा देऊ..
अनेक ऑफर आल्या,तरी आम्ही पवार साहेबांसोबत एकनिष्ठ राहिलो.
शरद पवार यांच्यासोबत पक्ष सोडून सगळे जात असताना आम्ही खंबीरपणे उभे राहिलो आहे. आम्हाला अनेक पक्षातून खूप चांगल्या आणि मोठ्या ऑफर आल्या होत्या, मात्र तरीही आम्ही शरद पवारांना सोडून गेलो नाही. पण आमच्या निष्ठेला पक्षात किंमत नसेल आणि अभय जगताप यांना तिकीट मिळालं नाही तर आम्ही आमच्या पदाचा उद्याच राजीनामा देणार असल्याचे अनेक कार्यकर्त्यांनी सांगितले.