तिकिटासाठी विचार न झाल्याने जगतापांची राष्ट्रवादी काँग्रेस आणि शरद पवारांवर कमालीची नाराजी
दहिवडी : ता.१३
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने महायुतीच्या उमेदवाराला टक्कर देण्यासाठी माढा लोकसभा मतदार संघातून निष्ठेचा विचार न करता आयत्या उमेदवाराला तिकीट देण्याच्या निर्णयामुळे इच्छुक उमेदवार अभयसिंह जगताप हे चांगलेच नाराज झाले आहेत. वरकुटे मलवडी येथे शुक्रवारी सायंकाळी झालेल्या कार्यकर्त्यांच्या बैठकीत त्यांच्या भावना ऐकल्यानंतर अपक्ष लढायच की पक्षातून? याचा निर्णय दोन दिवसात घेणार असल्याचे सांगून पवार साहेब आणि पक्षाने माझ्या निष्ठेचा विचार केला नसल्याची खदखद अभयसिंह जगताप यांनी बोलून दाखवली.
जगताप म्हणाले की, माढा मतदार संघाचे प्रश्न डोक्यात घेऊन, देशपातळीवरील प्रश्न विचारात घेऊन मी ही निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहे. मात्र पक्षाने आणि पवार साहेबांनी माझ्यावर अद्यापपर्यंत विश्वास दाखवला नाही. कदाचित मीच तो विश्वास संपादन करण्यासाठी कमी पडलो असेल, त्यामुळेच साहेबांच्या डोक्यात अभय जगतापला तिकीट देण्याचा विचार आला नसावा,अशा भावना जगताप यांनी व्यक्त केल्या. त्याचबरोबर कार्यकर्त्यांच्या आग्रहानुसार आपण पक्षातून लढायचं की जनतेतून? याबाबतचा निर्णय दोन दिवसात होईल. कदाचित तो तुमच्या सगळ्यांच्या इच्छेनुसारच असेल ,असेही जगताप यांनी सांगितले.
सध्या महाविकास आघाडीकडून शरद पवार गटाचे माढा लोकसभेसाठी तिकीट हे अकलूजच्या धैर्यशील मोहिते पाटील यांना दिले जाणार असल्याच्या चर्चांना ऊत आला आहे. त्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार या पक्षाचे युवक प्रदेश सरचिटणीस अभयसिंह जगताप आणि त्यांचे कार्यकर्ते चांगलेच नाराज झाले आहेत.
शुक्रवारी सायंकाळी झालेल्या वरकुटे मलवडीतील कार्यकर्त्यांच्या बैठकीत माढा, सांगोला, करमाळा, पंढरपूर, माळशिरस, माण खटाव, कोरेगाव या तालुक्यातील कार्यकर्त्यांनी अभयसिंह जगताप यांच्या निवासस्थानी मोठ्या संख्येने हजेरी लावली होती. यावेळी काहीही झालं तरी लढायचचं, पवार साहेबांनी तिकीट दिलं नाही तर अपक्ष का होईना पण लढायचचं, अशी आग्रही भूमिका कार्यकर्त्यांनी घेतली होती. त्याचबरोबर शरद पवार यांनी अभयसिंह जगताप यांच्या निष्ठेला ओळखून त्यांना संधी द्यायला हवी. जे कार्यकर्ते आधी पक्षाच्या विरोधात होते, त्यांना किंमत देऊन निष्ठावंतांना डावलू नये. सगळे सोडून जात असताना अभय दादांनी पवार साहेबांचा आणि माढा लोकसभा मतदार संघाचा खांदा मजबूत करण्याचे काम केले आहे. त्यामुळे त्यांना वगळून शरद पवार यांनी आयत्या वेळी पक्षात येणाऱ्यांना तिकीट देऊ नये, अशी मागणी केली.
अभयसिंह जगताप हे माढा लोकसभा मतदार संघाचा आश्वासक चेहरा आहेत. त्यांनी चार महिन्यांपासून अवघा मतदार संघ पिंजून काढला आहे. मतदार संघातील आणि देश पातळीवर प्रश्नांची चांगली जाण आहे. त्यामुळे माढा लोकसभा मतदार संघात भाजपला चांगली लढत केवळ अभय जगताप हेच देऊ शकतात,त्यांना तिकीट मिळावे. अशी आग्रही भूमिका जगताप यांच्या कार्यकर्त्यांनी मांडली.
शरद पवार यांनी आणि पक्षाने निष्ठेचा विचार केला नाही तर , दादा तुम्ही अपक्ष मैदानात उतरा., बाकीचं आमच्यावर सोपवा, असे ठामपणे सांगितले.
चौकट :-
०१) जगतापांचे बंड शरद पवार यांची डोकेदुखी वाढवणार का?
तिकिटासाठी अद्यापपर्यंत विचार न झाल्याने अभय जगताप हे नाराज आहेत. त्यानुसार त्यांनी वेळप्रसंगी बंड करण्याचे संकेत देखील दिले आहेत, त्यामुळे अभय जगताप यांचे होऊ घातलेले बंड शरद पवार यांची माढा लोकसभा मतदार संघाच्यादृष्टीने डोकेदुखी वाढवणार का? हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.
०२) जगतापांची फडफड मोहिते पाटलांची धडधड वाढवणार का?
एकीकडे बंडाच्या पावित्र्यात असलेल्या अभयसिंह जगताप यांचा धैर्यशील मोहिते पाटील यांच्या उमेदवारीला विरोध आहे. आयत्या वेळी पक्षात प्रवेश करणाऱ्यांना तिकीट मिळू नये,अशी भूमिका जगताप आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी घेतली आहे. त्यामुळे अभय जगताप यांची स्वत:च्याच तिकिटासाठी चाललेली फडफड ही धैर्यशील मोहिते पाटील यांची धडधड वाढवणार का? हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.
०३) राष्ट्रवादीचे अनेकजण म्हणतात, जगतापांचे बंड शरद पवार थंड करतील…!
अभय जगताप हे बंडाच्या पावित्र्यात असले तरी त्यांचे बंड हे शरद पवार साहेब सहज थंड करतील,त्यांची समजूत घालून यावर नक्की मार्ग काढतील,असे शरद पवार यांच्याशी एकनिष्ठ असलेल्या राष्ट्रवादीच्या अनेकजणांचे म्हणणे आहे.




















