शिक्षकदिनाच्या निमित्ताने
महाराष्ट्र न्यूज : आपल्या देशात 5 सप्टेंबर हा दिवस शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो. शिक्षकांनी समाजासाठी दिलेल्या योगदानासाठी आणि ज्ञानदानासाठी त्यांचे यथोचित कौतुक करणे आणि आभार मानाने हाच यामागचा हेतू आहे. 5 सप्टेंबर यादिवशी महान शिक्षक डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांची जयंती आहे, जे शिक्षणावर विश्वास ठेवणारे, मुत्सद्दी, अभ्यासक, भारताचे राष्ट्रपती आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे शिक्षक होते.
एकदा सरांचे काही विद्यार्थी आणि मित्र त्याच्या जवळ गेले आणि त्यांना त्यांचा वाढदिवस साजरा करण्याची परवानगी देण्याची विनंती केली तेव्हा ते म्हणाले, “माझा वाढदिवस स्वतंत्रपणे साजरा करण्याऐवजी, 5 सप्टेंबर हा शिक्षक दिन म्हणून साजरा केला तर ते माझ्यासाठी अभिमानास्पद असेल”. अगदी त्यादिवसापासून भारतात 5 सप्टेंबर हा दिवस शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो. त्यानंतर १९६५ मध्ये, डॉ. एस. राधाकृष्णन यांच्या काही प्रमुख विद्यार्थ्यांनी त्या महान शिक्षकाला नमन करण्यासाठी मेळावा आयोजित केला. त्या मेळाव्यात, डॉ. राधाकृष्णन यांनी त्यांच्या भाषणात त्यांच्या जयंती उत्सवाबद्दल सखोल मत व्यक्त केले आणि देशातील सर्व महान शिक्षकांना श्रद्धांजली अर्पण करून त्यांची जयंती ‘शिक्षक दिन’ म्हणून साजरी केली पाहिजे यावर भर दिला. तेव्हा पासून आजपर्यंत ५ सप्टेंबर हा दिवस शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो.
सध्याच्या युगात शिक्षकांसमोर अनेकविध प्रकारची आव्हाने आहेत विशेषतः सुमारे दीड वर्षांपासून निर्माण झालेल्या कोरोना परिस्थितीमुळे शिक्षक आणि विद्यार्थी शाळा व महाविद्यालयापासून दूर आहेत. सध्या ज्ञानदानचं काम हे ऑनलाइन पद्धतीने चालू आहे. ज्याला डिजिटल एजुकेशन असं देखील म्हणतात. यामध्ये सध्या शिक्षकांना खूप साऱ्या समस्यांना तोंड द्यावं लागत आहे. नुकत्याच झालेल्या सर्वेक्षणामध्ये असे दिसून आले कि जवळपास ८४% शिक्षकांना ऑनलाईन शिक्षणात अनेक आव्हानांचा सामना करावा लागतो.
लर्निंग स्पायरलद्वारे करण्यात आलेल्या ऑनलाइन सर्वेक्षणात असे दिसून आले की ज्यापद्धतीने मुलांना डिजिटल पद्धतीने शिक्षण मिळवताना अडचणी येतात, तशाच शिक्षकांना देखील डिजिटल माध्यमांद्वारे शिक्षण देण्यात अडचणी येत आहेत. आश्चर्यकारक बाब म्हणजे जवळपास ८४% शिक्षकांनी डिजिटल पद्धतीने शिक्षण देण्यामध्ये आव्हानांचा सामना केला आहे आणि जवळपास निम्म्यापेक्षा जास्त शिक्षकांना इंटरनेट आणि संबंधित समस्यांचा सामना करावा लागत आहे. प्रत्येक पाच शिक्षकांपैकी दोन शिक्षकांना डिजिटल पद्धतीने शिक्षण देण्यासाठी आवश्यक साधनांचा अभाव आहे; विशेषतः उत्तर प्रदेश आणि छत्तीसगडमध्ये परिस्थिती गंभीर आहे जिथे अनुक्रमे ८०% आणि ६७% शिक्षकांना ऑनलाईन शिक्षण देण्यासाठी आवश्यक उपकरणांची कमतरता आहे. सदर आव्हाने थेट शिक्षकांच्या सज्जतेच्या अभावाशी जोडलेली आहेत. २०% पेक्षा कमी शिक्षकांनी डिजिटल शिक्षण देण्यावर अभिमुखता प्राप्त केल्याची माहिती दिली आहे, तर बिहार आणि झारखंडमध्ये हा आकडा ५% पेक्षा कमी होता. ऑनलाईन क्लासेस दरम्यान येणाऱ्या तांत्रिक समस्यांव्यतिरिक्त इतर विविध अडथळे आहेत, जसे ऑनलाईन क्लासेस दरम्यान पालकांची उपस्थिती, ऑनलाईन शिस्त राखणे, विद्यार्थ्यांचे अभिप्राय घेणे, विद्यार्थ्यांना ऑनलाईन वर्गामध्ये एकाग्र ठेवणे इ. तसेच शिक्षकांना आयटी सपोर्टचा अभाव, सतत तांत्रिक बदल, सर्व विद्यार्थ्यांसाठी असमान प्रवेश, मोबाईल डिव्हाइसेससाठी अनओप्टीमाइज्ड सॉफ्टवेअर आणि सुरक्षा समस्या यासारख्या आव्हानांचा सामना करावा लागतो.
परंतु, हे देखील तितकेच खरं आहे कि दरम्यानच्या काळामध्ये शिक्षकांनी तंत्रज्ञानातील अनेकविविध गोष्टी आत्मसात केल्या आहेत. अनेक शिक्षकांनी स्वतःचे नवीन तंत्रज्ञान विकसित केले आहे जेणेकरून विद्यार्थ्यांना घरबसल्या सहजरित्या पुस्तके आणि व्हिडिओ इ. च्या माध्यमातून अभ्यासक्रम शिकता येत आहे. काही शिक्षकांनी त्यांचे स्वतःचे मोबाईल अॅप विकसित केले आहे. यूट्यूब चा वापर करून सध्या अनेक शिक्षक स्वतःचे रेकॉर्डेड व्हिडिओ विदयार्थ्यांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न करत आहेत. ग्रामीण दुर्गम भागातील शिक्षक देखील यामध्ये मागे नसून नवीन तंत्रज्ञान आत्मसात करीत आहे जेणेकरून त्यांच्या भागातील विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहणार नाहीत. तथापि यामधून हेच निदर्शनास येते कि शिक्षक हे त्यांची शैक्षणिक जबाबदारी पार पाडत असताना स्वतःदेखील एखाद्या विद्यार्थ्यांप्रमाणे नवनवीन गोष्टी शिकत आहेत आणि त्या विदयार्थ्यांपर्यंत पोहचवीत आहेत. म्हणतात ना मुले हे देशाचं भविष्य आहेत आणि या मुलांना योग्य पद्धतीने घडविण्याच काम शिक्षक आयुष्यभर करत असतो जे नक्कीच एक सबल राष्ट्रनिर्मितीचं कार्य आहे. आजच्या या शिक्षकदिनानिमित्त तमाम शिक्षकांना खूप खूप शुभेच्छा.
धन्यवाद
प्रा. डॉ. प्रविण विठ्ठल यादव
[Ph.D., M.Com., MBA(HR), MCM]
सहाय्यक प्राध्यापक
अनेकान्त एज्युकेशन सोसायटी
अनेकान्त इन्स्टिट्युट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज,
बारामती, जि-पुणे