दहिवडी : ता.१९
राष्ट्रवादीचे शरद पवार गटाचे माणमधील नेते प्रभाकर देशमुख यांची माढा लोकसभा मतदार संघाबाबत भूमिका अद्याप स्पष्ट न केल्याने जनतेमधून राजकीय तर्क वितर्कांना उधाण आले आहे. सध्या त्यांची भूमिका गुलदस्त्यात असल्याने ते काय भूमिका घेतात हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.
काही दिवसांपूर्वी शरद पवार गटाकडून धैर्यशील मोहिते पाटील यांच्या प्रचाराचा नारळ शिवरत्त्न’वर फोडण्यात आला. मात्र या कार्यक्रमाला प्रभाकर देशमुख यांच्याऐवजी त्यांची कन्या हर्षदा देशमुख -जाधव या उपस्थित असल्याचे पहावयास मिळाले. त्याचबरोबर माण तालुक्यातील ‘आमचं ठरलयं’ या टीम मधील बहुतांशी नेते हे महविकास आघाडीच्या उमेदवाराला पाठिंबा देणार आहेत, हे जवळपास स्पष्ट झाले आहे. त्यामध्ये मूळ भाजपचे असलेले अनिल देसाई, काँग्रेसचे रणजितसिंह देशमुख यांनी मेळावे घेत आपली भूमिका जाहीर केली आहे. या टीममधील डॉ. दिलीप येळगावकर यांनी रणजितसिंह निंबाळकर यांची साथ देणे पसंत केले असले तरी मागच्या निवडणूकीत रणजितसिंह निंबाळकर यांना साथ देणाऱ्या शेखर गोरे यांनीही आपली भूमिका वडूज येथील कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात स्पष्ट केली आहे. या मेळाव्यात त्यांनी महाविकास आघाडीची साथ देत आघाडी धर्म पाळणार असल्याचे स्पष्ट केले आहे.
मात्र प्रभाकर देशमुख हे शरद पवार गटाचे नेते आहेत. तरीही त्यांनी माढयाबाबत कोणतीच ठाम भूमिका न घेतल्याने राजकीय तर्क-वितर्क लावले जात आहेत.
काही दिवसांपूर्वी मराठा सेवा महासंघाच्यावतीने महायुतीला पाठिंबा दिल्याची बातमी टिव्ही9 या वृत्तवाहिनीवर प्रसिद्ध झाली होती. त्या बातमीत दाखवलेल्या फुटेजनुसार प्रभाकर देशमुख हे उपुख्यमंत्री अजित पवार यांच्या भेटीला गेल्याचे स्पष्ट दिसत होते. तसेच राज्यसभा खासदार निवडीवेळी देशमुख यांनी मकरंद पाटील यांच्या माध्यमातून पुण्यात अजित पवार यांची भेट घेतल्याचेही चर्चेतून ऐकण्यास मिळत होते. त्यामुळे प्रभाकर देशमुख हे अजित पवार गटात जाणार, अशा चर्चांना मोठे उधाण आले होते.
त्या अनुषंगाने प्रभाकर देशमुख यांनी आपली भूमिका अद्याप स्पष्ट न केल्याने प्रभाकर देशमुख यांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.