कार्यकर्त्यांकडून स्पष्टीकरण, धैर्यशील मोहिते पाटलांचेच काम करणार असल्याची माहिती
दहिवडी : ता.२०
राष्ट्रवादीचे शरद पवार गटाचे नेते प्रभाकर देशमुख हे कुठंही जाणार नसून ते शरद पवार आणि महाविकास आघाडीसोबत राहून धैर्यशील मोहिते पाटलांचा प्रचार करणार असल्याचे स्पष्टीकरण कार्यकर्त्यांच्या माध्यमातून देण्यात येत आहे.
काही दिवसांपूर्वी एका वृत्त वाहिनीवरील बातमीनुसार प्रभाकर देशमुख हे अजितदादांच्या भेटीला गेल्याचे दिसल्याने सर्वत्र राजकीय तर्क वितर्काना उधाण आले होते. यादरम्यान प्रभाकर देशमुख हे शरद पवार यांची साथ सोडून अजित पवार गटात जाणार असल्याबाबतची चर्चाही मोठया प्रमाणात सर्वसामान्य लोकांमध्ये रंगली होती. त्याअनुषंगाने दैनिक महाराष्ट्र न्यूजने बातमी प्रसिद्ध केली होती. प्रसिद्ध झालेल्या बातमीनंतर प्रभाकर देशमुख यांनी धैर्यशील मोहिते पाटलांचा प्रचार सुरू केलाय, त्यासाठी ते गावोगावी फिरत आहेत. अशा प्रकारे कार्यकर्त्यांकडून सांगण्यात आल्याने लोकांमधील चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे. तसेच माढ्यातून महाविकास आघाडीला भक्कम करण्यासाठी आणि धैर्यशील मोहिते पाटील यांना निवडून आणण्यासाठी प्रभाकर देशमुख यांनी गावोगावच्या कार्यकर्त्यांना भेटणे सुरू केल्याने ते शरद पवार यांच्यासोबतचं राहणार असल्याचे सध्या तरी दिसत आहे.