दहिवडी : ता.१८
दहिवडी नगरपंचायतीकडून नागरिकांच्या जीवाशी खेळ केला पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन चक्क सांडपाण्यातून जात असल्याचा गैरप्रकार उघडकीस आला आहे.
याप्रकरणी नगरपंचायतीकडून स्वच्छता निविदा तयार करण्यात आली, मात्र ती केवळ कागदावरच राहिल्याचे चित्र दिसत आहे.
दहिवडी नगरपंचायतीचा स्वच्छता विभागही या प्रकाराकडे दुर्लक्ष करत असून दहिवडी नगरपंचायतीच्या इमारतीच्या मागच्या बाजूलाच असलेल्या कॅनॉलमध्ये सर्वत्र सांडपाणी साचले आहे. हिरवेगार दिसणाऱ्या या सांडपाण्यात मोठ्या प्रमाणात घाणीचे साम्राज्य पसरले आहे.
त्यातूनच नगरपंचायतीची पाणीपुरवठा करणारी पाईपलाईन गेली असल्याने दहिवडीकरांचे आरोग्य धोक्यात आल्याचे चित्र आहे. यामुळे सांडपाण्यातून गेलेल्या पाईपलाईनद्वारे गढूळ पाण्याचा पुरवठा गेले कित्येक दिवसापासून नागरिकांना होतच आहे. मात्र आता सांडपाणीही नागरिकांना पिण्यास मिळणार असेल तर नागरिकांच्या आरोग्याचा मोठा प्रश्न निर्माण होऊ शकतो. काविळीसारखे अनेक गंभीर आजार नागरिकांना त्रासदायक ठरू शकतात. त्यामुळे
याप्रकरणी दहिवडी नगरपंचायतीचा स्वच्छता विभाग कितपत लक्ष देऊन या गोष्टीला गांभीर्याने घेणार? स्वच्छता निविदा ही केवळ कागदावर न राहता नागरिकांच्या आरोग्यासाठी तिची अंमलबजावणी होणार का? दहिवडीची स्वच्छता ही केवळ कागदावर न राहता वास्तवात होणार का? नागरिकांचे आरोग्य धोक्यातून बाहेर येणार का? हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.