सातारा : येथील श्याम सुंदरी रिलीजीअस अँड चॅरिटेबल ट्रस्टच्या के. एस.डी. शानभाग विद्यालय व ज्युनियर कॉलेज येथे नुकतेच तीन दिवसीय पोलीस विभाग सातारा कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यशाळेचे मध्ये ऑनलाइन मार्गदर्शन करण्यात आले. पोलीस काका व पोलीस दीदी या उपक्रमाअंतर्गत विद्यार्थ्यांचे, बालकांचे शारीरिक, मानसिक व लैंगिक अत्याचार व त्या संदर्भातील दंड संहिता तसेच अल्पवयीन व महिला विषयीच्या कायद्याविषयी विद्यार्थ्यांच्या संरक्षणाविषयी अनमोल मार्गदर्शन करण्यात आले. हे मार्गदर्शन पहिली ते बारावीच्या विद्यार्थी विद्यार्थिनींना व त्यांच्या पालकांसाठी आयोजित करण्यात आले होते.
या कार्यशाळेत मार्गदर्शनासाठी सातारा जिल्हा पोलिस विभागाच्या वतीने शाहूपुरी पोलिस ठाण्याच्या पोलिस हवालदार नीलम सूर्यवंशी व पोलीस नायक तुषार दमकले हजर होते. त्यांनी विद्यार्थ्यांचा वयोगट लक्षात घेऊन त्यांच्या पातळी अनुसार विद्यार्थ्यांनी स्वतःचे संरक्षण कसे करावे हे समजावून सांगितले. या कार्यशाळेस पालकांचाही चांगला प्रतिसाद मिळाला. या कार्यशाळेत विद्यालय व ज्युनिअर कॉलेजच्या पहिली ते बारावीच्य 867 विद्यार्थ्यांनी लाभ घेतला.
या कार्यशाळेच्या उत्कृष्ट संयोजनासाठी विद्यालय व ज्युनिअर कॉलेजचे संस्थापक व ज्येष्ठ मार्गदर्शक रमेश शानभाग, संचालिका सौ.आचल घोरपडे, माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ.रेखा गायकवाड व प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक भाग्येश कुलकर्णी यांनी विशेष परिश्रम घेतले. या अनोख्या कार्यशाळेसाठी विद्यालयाच्या वतीने आचल घोरपडे यांनी पोलीस विभाग साताराचे आभार मानले तसेच या कार्यशाळेत पालकांनीही विशेष सहभाग घेऊन आपला पाल्य व शाळेच्या वतीने मिळत असलेल्या विविध उपक्रमाच्या संदर्भात आवडीने सहभाग घेतला याबद्दल पालकांचेही आभार मानण्यात आले. या कार्यशाळेसाठी शाळेच्या सर्व शिक्षक शिक्षिका तसेच कार्यालयीन कर्मचारी यांनी आपले योगदान दिले.