शेरेमध्ये राबली ग्रामस्वच्छता ; रांगोळ्याही रेखाटल्या
महाराष्ट्र न्यूज कराड प्रतिनिधी : शेरे (ता. कराड) येथे एकाचवेळी गाव व विस्तारीत भागात ग्रामस्वच्छता अभियान राबविण्यात आले. यामध्ये ग्रामस्थ, तरुण वर्ग व महिलांनी उस्फुर्तपणे सहभाग घेत हे अभियान यशस्वी केले. गटारे, रस्ते व बेशरमीच्या ठिकाणांची साफसफाई करत स्वच्छतेचा एल्गार केला. स्वच्छ परिसरात मोहकपणा आणण्यासाठी महिलांनी रांगोळ्या रेखाटून या अभियानातील एकप्रकारे रुची वाढवली. स्वच्छता अभियानाचे गावामध्ये हे तिसरे वर्ष सुरु आहे.
शेरे येथे तीन वर्षापूर्वी माउली ग्रामविकास प्रतिष्ठान स्थापन झाले. गावातील तरुण, बाहेरगावी नोकरीस असणारे भूमिपुत्र व ग्रामस्थ आणि महिलांच्या सहयोगाने प्रतिष्ठानने अनेक उपक्रम यशस्वी केले आहेत. भिंतीवर सुविचारांची मांडणी, अडगळीतील जागांची स्वच्छता, रक्तदान व आरोग्य शिबीरे, गावात येणाऱ्या रस्त्यांच्या दुतर्फा सुमारे अठराशे झाडांचे वृक्षारोपण यासह सामाजिक उपक्रमांना प्रतिष्ठानने एकजूट ठेवून चालना दिली आहे.
लॉकडाऊन काळात श्रमदानातून नदीकिनाऱ्यावरील सुमारे तीन एकर क्षेत्रातील बाभळी काढून त्या क्षेत्रात वृक्षारोपण केले आहे. गेली तीन वर्षे सामाजिक उपक्रमात सातत्य ठेवतच हे प्रतिष्ठान दरवर्षी एक दिवस संत गाडगे महाराज यांच्या संकल्पनेतील ग्रामस्वच्छता अभियान राबवत आहे. त्यानुसार नुकतीच गाव व विस्तारीत भागातील पवार मळा, विश्वास मळा, गोरक्षनाथ मठ, शेरे पाटी, थोरात मळा, संजयनगर व स्टेशन परिसरात स्वच्छता करण्यात आली. सर्व मंडळाचे कार्यकर्ते, ग्रामस्थ व महिलांनी हातात खोरे, पाटी घेऊन स्वच्छता केली. गटारांमधील दुर्गंधी हटवण्याबरोबर बेशरमीच्या ठिकाणांचीही स्वच्छता झाल्यानंतर गाव व परिसर प्रसन्न दिसू लागला. त्यानंतर महिलांनी घरांचे अंगण व रस्त्यांवर रांगोळ्या रेखाटून या अभियानास मोहकतेची जणू किनारच दिली.