महाराष्ट्र न्यूज प्रतिनिधी –
एका महत्त्वाच्या आदेशानुसार शासनाने कर्मचारी, अधिकारी तसेच कार्यालयात भेट देणाऱ्या नागरिकांनी काय खबरदारी घ्यावी याचे निर्देश दिले आहेत. संबंधित सर्वांनी या नियमांचे पालन काटेकोरपणे करावे, असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी संजय भागवत यांनी केले आहे. शासनाने नुकत्याच दिलेल्या निर्देशानुसार सविस्तर नियमावली तयार केली आहे. त्या पार्श्वभूमीवर भागवत बोलत होते. कर्मचारी आणि अधिकाऱ्यांनी कार्यालयात आल्यावर काय खबरदारी घ्यावी तसेच नागरिकांनी कार्यालयात आल्यावर काय काळजी घ्यावी याबाबत सविस्तरपणे शासनाने नियम पाठविले आहेत त्यानुसार कर्मचारी तसेच नागरिकांनी कार्यालयात येते वेळी थर्मल स्कॅनरवर तापमान पहावे आणि खात्री करावी. कार्यालयाला भेट देणारे अभ्यागतांना मास्क वापरणे अनिवार्य आहे, तसेच कर्मचारी अधिकाऱ्यांना देखील पूर्णवेळ मास्क वापरणे अनिवार्य आहे. कार्यालयातील खिडक्या उघड्या ठेवाव्यात. शिंकताना, खोकताना तोंडावर रुमाल धरावा. कर्मचाऱ्यांनी एकत्र थांबू नये. तीन फूट अंतर पाळावे. दर दोन तासांनी हात धुवावेत. कार्यालयातील वस्तू निर्जंतुक कराव्यात. दिवसातून तीन वेळा सर्व वस्तू स्वच्छ कराव्यात. एकत्र बैठका घेणे टाळून व्हीडिओ कॉन्फरन्सद्वारे संपर्क साधावा अशा सूचना दिल्याचे सांगून भागवत पुढे म्हणाले,”कर्मचारी आणि अधिकाऱ्यांनी सातत्याने स्वच्छता ठेवणे गरजेचे आहे .कमीत कमी अभ्यागतांना कार्यालयात प्रवेश देण्यात यावा असे देखील आदेशात म्हटले आहे. कर्मचाऱ्यांपैकी कोणास विषाणूची लागण झाल्यास काय करावे याबद्दल देखील सविस्तर मार्गदर्शक सूचना देण्यात आल्या आहेत. अशा सर्वच सूचनांचे कर्मचारी, अधिकारी आणि कार्यालयाला भेट देणार्या अभ्यागत यांनी काटेकोरपणे पालन करावे”. वैयक्तिक आणि सामाजिक स्वच्छता आणि नियम काटेकोरपणे पाळल्यास या संकटावर मात करता येणे सहज शक्य आहे, असा विश्वास देखील भागवत यांनी व्यक्त केला.