गत हंगामातील गाळप उसाला सातारा जिल्ह्यातील अनेक कारखान्यांनी शेतकर्यांना पूर्ण एफआरपीची रक्कम आदा केली नाही. त्यामुळे जिल्ह्यातील ऊसउत्पादक अजून एफआरपीच्या प्रतीक्षेत राहिला आहे. ती ताबडतोब मिळावी या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर रयत क्रांती संघटनेचे हे आंदोलन सुरु करण्यात आले आहे.
यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की जिल्ह्यात गत हंगामातील उसाची एफआरपी फक्त अजिंक्यतारा, सह्याद्री या कारखान्यांनीच संपूर्ण एफआरपी दिली आहे. मात्र अन्य कारखान्यांनी एफआरपीबाबत काहीच सुतोवाच केलेले नाही.
अनेक दिग्गज मानल्या जात असलेल्या कारखान्यांकडून तर आता पुढील टप्प्यात राहिलेल्या बिलाचे पाहू असे आश्वासन देण्यात येत आहे . अर्थात यासाठी ते कारखानदार साखरेच्या घसरलेल्या दर आणि कोरोनाकडे बोट दाखवित आहेत. राज्यातील अगदी दुष्काळी भागातील काही कारखान्यांनी देखील गेल्या हंगामासाठी प्रतिटन उसाला एफआरपी तर दिली आहेच, शिवाय काहींनी त्यापेक्षा जादा रकमेचे बिल दिले आहे. मात्र सातारा जिल्ह्यातील शेतकर्यांना या उलट अनुभव येतो आहे. बहुसंख्य साखर कारखानदारांनी कोरोना व लॉकडाऊनमुळे गत हंगामातील एफआरपी देता येत नसल्याची भूमिका घेतली आहे.
दरम्यान एफआरपी एकरकमी न मिळाल्याने त्याचा फटका शेतकर्याला बसू लागला आहे. कोरोना व लॉकडाऊनमुळे शेतकरी अडचणीत आला आहे. ऊसदर नियंत्रण कायद्यानुसार साखर कारखान्याने गाळपासाठी शेतकर्याचा ऊस तोडून नेल्यानंतर १४. दिवसांच्या आत निश्चित केलेली ‘एफआरपी’ची रक्कम संबंधित शेतकर्याला देणे बंधनकारक आहे. यासाठी कारखाने असमर्थ ठरले तर जिल्हा प्रशासनाने कारवाई करुन संपूर्ण एफआरपी वसूल करुन देण्याची तरतूद आहे. तसेच १४ दिवसानंतर दिलेल्या एफआरपी बरोबर त्या रकमेचे व्याज देण्याचे बंधन आहे. मात्र बहुसंख्य कारखान्यांनी ही तरतूद ठोकरून लावली असल्याचे चित्र आहे.
तरी जिल्हा प्रशासनाने कारखान्यांना १० दिवसात एफआरपीची रक्कम आदा करण्यात यावे अन्यथा तीव्र रयत क्रांती संघटनेच्या वतीनेआंदोलन करण्यात येईल असा इशारा या निवेदनाद्वारे रयत क्रांती संघटनेच्या कार्यकर्त्यांनी दिला आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आजपासून बेमुदत हे आंदोलन सुरू केले असून याआंदोलनात मधुकर जाधव जिल्हा उपाध्यक्ष रयत क्रांती संघटना प्रकाश साबळे युवक जिल्हा उपाध्यक्ष प्रमोद जाधव राजेंद्र काटे विनोद काटे विशाल सावंत नंदकुमार सावंत विक्रम जाधव अजित सावंत अधिक शेतकरी वर्ग उपस्थित होते.