महाराष्ट्र न्यूज प्रतिनिधी –
सातारा जिल्ह्यातील कोरोना बाधित रुग्णांच्या वाढत्या पार्श्वभूमीवर फलटण येथील उपजिल्हा रुग्णालयात कोरोना उपचारासाठी आवश्यक साधने, सुविधा, वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचारी उपलब्ध करून द्यावेत आणि त्यासाठी उपचार रुग्णालय, केंद्र तातडीने उभे करावे अशी मागणी फलटण तालुक्यातील पत्रकार आणि वृत्तपत्र संपादकांनी आ. दीपक चव्हाण यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे. त्याला सकारात्मक प्रतिसाद देण्याचे आश्वासन आमदार चव्हाण यांनी यावेळी दिले.
त्या निवेदनात नमूद करण्यात आल्याप्रमाणे ‘फलटण शहर आणि तालुक्यात कोविड -१९ च्या नियंत्रणासाठी शासन तसेच प्रशासनाने काढून दिलेल्या सर्व नियम, निकष यांची अंमलबजावणी करीत नागरिकांनी प्रशासनास सहकार्य केले आहे. प्रशासनानेही ही महसूल, पोलिस, आरोग्य पंचायत समिती अधिकारी कर्मचारी लोकप्रतिनिधी यांनी प्रत्यक्ष प्रत्यक्ष मदत केल्याने फलटण तालुक्यात कोरोनाचा प्रादुर्भाव नियंत्रणात राहिला आहे. येथे मोठ्या संख्येने आलेल्या नातेवाईक, मित्रमंडळी, कुटुंबीय यांच्यामुळे काही रुग्ण फलटण तालुक्यात आढळले आहेत. फलटण मध्ये आशा रुग्णांवर उपचार करण्यासाठी पुरेशा सुविधा उपलब्ध नसल्यामुळे उपजिल्हा रुग्णालयातील ५ आय. सी. यु. आणि ५ ऑक्सिजन बेड तयार करून उपचारासाठी कार्यवाही व्हावी अशी मागणी करण्यात आली आहे. भविष्यातील धोका लक्षात घेता फलटण गिरवी रस्त्यावरील वापराविना असलेले ग्रामीण रुग्णालयाची इमारत आवश्यक त्या दुरुस्त्या करून तेथे रुग्णालय उभा करण्यात यावे, तसेच शंकर मार्केट येथील नगरपरिषद दवाखान्याची अशाचप्रकारे आवश्यक वैद्यकीय साधने सुविधा व ५ बेडचे आयसीयू केंद्र तातडीने उभ्या काढण्यात यावे. अन्यथा शासनाचे या गंभीर विषयाकडे लक्ष वेधण्यासाठी शांततेच्या मार्गाने पत्रकारांतर्फे लाक्षणिक उपोषण करण्यात येईल’ असा इशाराही त्यात देण्यात आला आहे. या निवेदनाची प्रत महाराष्ट्र विधानपरिषद सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर, पालकमंत्री बाळासाहेब पाटील, जिल्हाधिकारी जिल्हा पोलिस प्रमुख आदींना पाठविण्यात आले आहेत.