वाईचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब भरणे यांच्या काम करण्याच्या कौशल्याने घटनास्थळावरूनच गुन्हेगार अटकेत…….
घटनेची माहिती मिळताच वाई पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब भरणे सहकाऱ्यांसमवेत घटनास्थळी दाखल ; कसून चौकशी केली असता गुन्हेगारांकडून गुन्हा कबूल
शेंदुरजणे येथील मॅप्रो कंपनीच्या आवारात मॅप्रो कंपनी ते शेंदुरजणे डोंगरावर जाणाऱ्या कच्चा रोडवर शेंदुरजणे गेट नंबर ११० वर मॅप्रो कंपनीतील कामगार भानुदास मारुती शेंडे (३५) मूळ राहणार पारडीठवरे ता.नागभीड जि.चंद्रपूर याचा खून झाल्याची घटना दि.९ रोजी घडली असल्याची फिर्याद वाई पोलीस ठाण्यात कंपनीचे सिक्युरिटी गार्ड शंकर यादव वय वर्षे २४ यांनी दिली . मयत भानुदास शेंडे हा गेल्या दोन वर्षापासून मॅप्रो कंपनीत कॉन्ट्रॅक्ट बेसवर कामाला होता.
त्याला दारूचे व्यसन असल्यामुळे तो रोज दारू पिऊन सहकाऱ्यांना शिवीगाळ करणे, भांडण करणे अशा गोष्टी करायचा. यातच दि.८ रोजी कामावरून सुटल्यानंतर रात्री १० वाजण्याच्या सुमारास भानुदास शेंडे हा दारू पिऊन आल्याने नेहमीप्रमाणे त्याच्याबरोबर एकत्रित राहण्यास असणारे त्याचे सहकारी १)मनोज संगेल रा.तोलोदि ता.नागभीड जि. चंद्रपूर २)प्रफुल्ल चेन्नकार रा.तोलोदि ता.नागभीड जि. चंद्रपूर ३) जितेंद्र नेवारे रा. नावेगावहूंडेश्वरी ता.नागभीड जि. चंद्रपूर यांच्याशी भांडण झाले. या भांडणाचा राग मनात धरून वरील तिघांनी मयत भानुदास शेंडे याला लाकडी दांडके, लोखंडी पाइप व पायातील बुटांनी मारहाण केली. याच मारहाणीत त्याचा मृत्यू झाला. ही बाब कंपनीचे सिक्युरिटी गार्ड शंकर यादव यांच्या सकाळी निदर्शनास आल्यावर त्यांनी कंपनी व्यवस्थापनाशी संपर्क साधून त्यांना निदर्शनास आलेली घटना सांगितली. कंपनी प्रशासनाने तात्काळ वाई पोलीस स्टेशनशी संपर्क साधून झालेल्या घटनेची माहिती दिली. या घटनेची माहिती मिळताच वाई पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब भरणे यांनी आपल्या सहकाऱ्यांशी संपर्क साधून तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. वरील तीनही जणांकडे कसून चौकशी केली असता त्यांनीच खून केल्याचे सांगितले. यानुसार आता पुढील तपास पो.नि. बाळासाहेब भरणे यांच्या मार्गदर्शनाखाली API तेलतुंबडे करित आहेत.