महाराष्ट्र न्युज जळोची प्रतिनिधी दिगंबर पडकर
१५ जुलै रोजी पुणे जिल्हा परिषदेचे जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षकांची कोविड १९ उपचार केंद्र व विलगीकरण केंद्रावर नियुक्ती केल्याचे आदेश निर्गमित केले आहेत.यामध्ये अत्यावश्यक सेवेतून सूट असलेल्या अनेक अपंग शिक्षकांचा तसेच मधुमेह,उच्च रक्तदाब असलेल्या प्राथमिक शिक्षकांचा समावेश करण्यात आला आहे.तसेच या कामाचा शिक्षाकांना कसलाही अनुभव नाही.त्यामुळे सदरचे आदेश रद्द करावेत अशी मागणी मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद पुणे यांच्याकडे महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे सरचिटणीस केशव जाधव यांनी केली आहे.
कोविड १९ उपचार केंद्रावर व विलगीकरंण केंद्रावर प्रतिबंधात्मक उपाययोजनेस सहकार्य व्हावे याकरिता जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातून ५० वर्षे वयाच्या आतील ५० प्राथमिक शिक्षकांची नेमणूक करण्यात आली आहे. प्राथमिक शिक्षकांना यासंदर्भात कसलेही प्रशिक्षण मिळालेले नसून या कामाचा कसलाही अनुभव नाही.तसेच सद्यस्थितीत शालेय कामकाज सुरु असून विद्यार्थ्याचे गुगल क्लासरूम तयार करणे,त्यांना ऑनलाईन अभ्यास देणे त्याची पडताळणी करणे आदी कामे शिक्षक करीत आहेत.तसेच यापूर्वी शिक्षकांनी कोरोना सर्वेक्षण, रेशनिंगवरील धान्य वाटपाचे सनियंत्रण,चेकपोस्ट सांभाळणे इत्यादी कामे केली आहेत.त्यामुळे कोविड १९ उपचार केंद्र व विलगीकरण केंद्रावरील नियुक्ती आदेश रद्द करण्याबाबतची मागणी मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद पुणे यांच्याकडे करण्यात आली आहे.निवेदनाची प्रत पुणे जिल्हा परिषद उपाध्यक्ष रणजित शिवतारे तसेच आरोग्य सभापती प्रमोद काकडे यांना पाठविण्यात आली असल्याचे जाधव यांनी सांगितले.