बारामती प्रतिनिधी :
बारामती तालुक्यातील सोरटेवाडी येथील केंजळे कुटुंबाच्या वतीने दरवर्षी प्रमाणे याही वर्षी संत सोपानदेव महाराज पालखी सोहळ्यासाठी पाठविण्यात येणारी बैलजोडी परंपरेला खंड पडू न देता चालू वर्षीही पाठविण्यात आली मात्र कोरोनामुळे प्रत्यक्षात ही बैलजोडी सासवड येथे न जाता येथील केंजळे वाड्यातच पूजन करून पुन्हा बांधण्यात आली. संत सोपानदेव महाराज पालखी सोहळ्यासाठी रथ ओढण्याचा मान सोरटेवाडी येथील केंजळे कुटुंबाला आहे. दरवर्षी ते या सोहळ्यासाठी उत्साहात बैलजोडी पाठवतात. मात्र चालू वर्षी कोरोनामुळे सर्वच पालखी सोहळे रद्द झाल्याने वारकरी सांप्रदायाला वारीचा अनुभव घेता आला नाही.
बुधवारी(दि.१७) रोजी येथील केंजळे वाड्यात बैलजीडीची पारंपरिक पध्दतीने पूजन करण्यात आले. यावेळी शेतकरी कृती समितीचे जिल्हाध्यक्ष सतिश काकडे, सोमेश्वरचे संचालक विशाल गायकवाड, सोरटेवाडीचे सरपंच दत्तात्रय शेंडकर, करंजेपुलचे सरपंच वैभव गायकवाड, डॉ. सोमप्रसाद केंजळे, विजय राजवडे, श्रीपाल सोरटे, सोमनाथ सोरटे, माणिक लकडे तसेच केंजळे कुटूंबातील ज्ञानेश्वर केंजळे, विकास केंजळे, प्रसाद केंजळे, अरुंधती केंजळे, ऋचा केंजळे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते. केंजळे कुटूंबातील कै.बापूसाहेब बाळाजी केंजळे हे सोपानकाकांच्या समाधीचे सेवेकरी होते. त्यांच्याकडे बैलजोडी पाठविण्याचा आलेला मान आजही केंजळे कुटुंबाने जपला असून पारंपरिक पध्दतीने ही बैलजोडी सासवडकडे पाठविण्यात आली.
परंपरेने गुरुवार(दि.१८) रोजी संत सोपानदेव महाराज यांच्या पालखीचे पंढरपूरकडे प्रस्थान होणार होते. कोरोनामुळे वारी रद्द झाली असली तरीही कोणत्याही प्रकारच्या विधी, परंपरा खंडीत न करता वारकरी सांप्रदाय आपली सेवा पांडुरंगचरणी अर्पण करत आहेत.