१ जुलैपर्यंत आणखी ४८ विमानांसाठीचे नियोजन
मुंबई दि. ८: वंदेभारत अभियानांतर्गत फेज १ आणि २ अंतर्गत ४७ विमानांद्वारे एकूण ६ हजार ७९५ नागरिक विविध देशातून महाराष्ट्रात परतले आहेत. या सर्वांना मुंबई विमानतळावर उतरवून घेण्यात येत असून आलेल्या प्रवाशांचे काटेकोर क्वारंटाईन करण्यात येत आहे.
आतापर्यंत परदेशातून आलेल्या नागरिकांमध्ये २१०७ प्रवासी मुंबईचे आहेत. उर्वरित महाराष्ट्रातील प्रवाशांची संख्या २४८३ इतकी आहे तर इतर राज्यातील प्रवाशांची संख्या २२०५ इतकी आहे.
आतापर्यंत ब्रिटन, सिंगापूर, फिलीपाईन्स, अमेरिका, बांग्लादेश, मलेशिया, कुवेत, इथियोपिया, अफगाणिस्तान, ओमान, दक्षिण अफ्रिका, इंडोनेशिया, नेदरलँड, जपान, श्रीलंका, म्यानमार, टांझानिया, स्पेन, आर्यलँड, कतार, हाँगकाँग, कझाकिस्तान, मॉरिशियस, ब्राझील, थायलंड, केनिया, मियामी अशा विविध देशातून प्रवाशी मुंबईत दाखल झाले आहेत.
याशिवाय १ जुलै २०२० पर्यंत ४८ फ्लाईटसद्वारे परदेशात अडकलेले नागरिक मुंबईत येणार आहेत.
बृहन्मुंबईतील प्रवाशांसाठी इंन्स्टिट्यूशनल क्वारंटाईनची सुविधा विविध हॉटेल्समध्ये करण्यात आली आहे. इतर जिल्ह्यातील व राज्यातील प्रवाशांना त्यांच्या जिल्हा मुख्यालयी पाठवण्याची व्यवस्था मुंबई उपनगर जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत करण्यात येत आहे. तिथे गेल्यावर त्यांना त्यांच्या जिल्हाधिकारी तसेच महापालिका आयुक्तांकडून क्वारंटाईन केले जात आहे.
इतर राज्यातील प्रवाशांचे वाहतूक पास संबंधित राज्याकडून प्राप्त होईपर्यंत त्या राज्यातील प्रवाशांना मुंबईतील क्वारंटाईन सेंटरमध्ये ठेवले जात आहे. या प्रवाशांचा वाहतूक पास संबंधित राज्याकडून प्राप्त होताच या प्रवाशांना त्यांच्या राज्यात पाठविण्यात येत आहे
वंदेभारत अभियान केंद्रीय नागरी उड्डाण मंत्रालय, विदेश मंत्रालय आणि केंद्रीय गृह मंत्रालय यांच्या समन्वयाने महाराष्ट्र शासन यशस्वीरित्या राबवित आहे





















