मुंबई, दि. 27 : नाशिक येथील शिक्षणाधिकारी यांच्याकडे बेहिशेबी मालमत्ता आढळल्या प्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून चौकशी सुरु आहे. मात्र, हे प्रकरण अधिक तपासासाठी अंमलबजावणी संचालनालयाकडे (ईडी) सोपविण्यात येईल, अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तारांकीत प्रश्नोत्तरे तासाच्या दरम्यान विधानसभेत दिली.
ते म्हणाले की, राज्यातील शालेय शिक्षण विभागातील ३२ वर्ग १ आणि वर्ग २ अधिकाऱ्यांची लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या वतीने चौकशी करण्यात येत आहे. संबंधित अधिकाऱ्यांची विभागीय चौकशीही सुरू करण्यात आली आहे.
शिक्षण क्षेत्रात बदलाची निश्चितपणे आवश्यकता आहे, असे सांगून उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले की, अनुदानित खाजगी शाळांतील पदभरती प्रक्रिया केंद्रीय पद्धतीने करता येईल का याचा विचार केला जाईल. त्यामुळे या पदभरती मधील गैरप्रकाराला आळा बसू शकेल. खाजगी कोचिंग क्लासेस मुळे शाळा – महाविद्यालयातील विद्यार्थी उपस्थितीवर परिणाम झाला आहे.त्यामुळे आगामी काळात किमान अनुदानित शाळांमध्ये विद्यार्थी उपस्थिती बाबत निर्देश देण्यात येतील. विद्यार्थ्यांची आधार नोंदणी प्रक्रिया शंभर टक्के पूर्ण केल्यानंतर विद्यार्थ्यांची संख्या निश्चित किती हे समजू शकेल, असे त्यांनी सांगितले.
सातारा येथील पदभरती संदर्भात अनियमितता झाली असेल तर त्याची चौकशी करण्यात येईल, अशी माहितीही त्यांनी दिली.
सदस्य पृथ्वीराज चव्हाण, रोहित पवार, अबू आझमी, नाना पटोले, योगेश सागर, महेश शिंदे, अशोक पवार, सीमा हिरे आदींनी या विषयावर झालेल्या चर्चेत भाग घेतला.