महाराष्ट्र न्यूज प्रतिनिधी :
मुंबई, : ग्रामीण भागात मुबलक प्रमाणात कृषीमाल उपलब्ध असून त्यावर प्रक्रिया करणारे उद्योग सुरू करण्यास मोठी संधी आहे. शिवाय ग्रामीण भागात स्वस्त दरात जमीन उपलब्ध आहे. उद्योग विभाग गुंतवणूकदारांना सर्व सहकार्य करण्यास तयार आहे, त्यामुळे आगामी काळात देश-विदेशातील उद्योजकांनी महाराष्ट्रात अन्न प्रक्रिया उद्योग सुरू करावेत, असे आवाहन उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी आज येथे केले.
राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या वतीने ‘ॲडव्हान्सेस इन स्मार्ट फूड प्रोससिंग टेक्नॉलॉजी’ या विषयावरील वेबिनारमध्ये श्री.देसाई प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. यावेळी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.विश्वनाथन, शरदराव गडाख, अशोकराव फरांदे आदी सहभागी झाले होते.
श्री.देसाई म्हणाले, देशातील 65 टक्के जनता कृषी क्षेत्रावर विसंबून असताना राष्ट्रीय उत्पन्नात शेतीचा चौदा टक्के हिस्सा असावा हे भूषणावह नाही. फळे, भाज्या वाया जाण्याचे प्रमाणही 30 टक्के इतके असून त्याचे मूल्य सुमारे 1 लाख कोटींच्या घरात जाते. त्यामुळे अन्न प्रक्रिया उद्योगांत मोठे काम करण्याची गरज आहे.
महाराष्ट्रात कृषी विकास आणि सेवा क्षेत्रासाठी सुविधा उपलब्ध आहेत. याशिवाय 12 फूड प्रोसेसिंग क्लस्टर आहेत. सोळा हजार छोटे-मोठे अन्न प्रक्रिया करणारे उद्योग आहेत. यात अजून वाढ होण्याची गरज आहे. राज्य शासन आणखी पाच फूड प्रक्रिया पार्क सुरू करण्याच्या तयारीत असल्याची माहिती श्री.देसाई यांनी दिली.
राज्याला मोठा समुद्रकिनारा लाभलेला आहे. किनारपट्टीच्या भागात माशांवर प्रक्रिया, पॅकिंग करण्याची गरज आहे. जगातील अनेक देश कृषीमालाचे मूल्यवर्धनासाठी प्रयत्न करतात. भारतातही तसेच प्रयत्न होणे आवश्यक आहे. मार्केटींग, ब्रँडींग क्षेत्रात रोजगाराच्या खूप संधी असल्याने या क्षेत्रात आपण उतरले पाहिजे. स्मार्ट फूड प्रोसेंसिग क्षेत्र जग बदलून टाकू शकते, असेही श्री.देसाई यांनी सांगितले.