सातारा : सातारा येथील रयत शिक्षण संस्थेच्या सावित्रीबाई फुले महिला महाविद्यालयाचे अर्थशास्त्र विभाग प्रमुख व महाराष्ट्र राज्य अर्थशास्त्र परिषदेचे माजी अध्यक्ष प्रो. डॉ. एस.एम. भोसले यांना शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर यांच्या वतीने देण्यात येणाऱ्या गुणवंत शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
शिवाजी विद्यापीठाच्या हीरक महोत्सवी वर्धापन दिनाचे औचित्य साधून शिवाजी विद्यापीठ कार्यक्षेत्रातील गुणवंत प्राध्यापकांना सन्मानित करण्यात आले. उच्च व तंत्र शिक्षण मंत्री नामदार चंद्रकांतदादा पाटील , शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के यांच्या हस्ते व विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत हा सन्मान सोहळा पार पडला.
प्रोफेसर डॉ. एस. एम. भोसले यांनी अर्थशास्त्र अभ्यास विषयात भरीव योगदान देत संशोधन व लेखन क्षेत्रात मोठे कार्य केले आहे. अर्थशास्त्र विषयावरील तब्बल पन्नास पेक्षा अधिक संदर्भ पुस्तकांचे लेखन, अनेक संशोधक विद्यार्थ्यांना मार्गदर्शन तसेच असंख्य राष्ट्रीय चर्चासत्रे व परिषदांमध्ये त्यांनी तज्ञ मार्गदर्शक म्हणून कार्य केले आहे.
महाराष्ट्र अर्थशास्त्र परिषदेचे अध्यक्ष म्हणून त्यांनी दिलेले योगदान महत्त्वाचे ठरले आहे. शिवाय महाराष्ट्रभरातील विविध अर्थशास्त्रविषयक संस्थांमध्ये त्यांनी महत्त्वाची पदे भूषविली आहेत. रयत शिक्षण संस्थेमध्ये प्रभारी प्राचार्य म्हणून त्यांनी कार्य केले असून व्यासंगी शिक्षक अशी त्यांची ओळख आहे.
यापूर्वीही अनेक महत्त्वाच्या पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आले आहे. शिवाजी विद्यापीठाकडून गुणवंत शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात आल्याबद्दल रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन डॉ. अनिल पाटील, सचिव प्राचार्य डॉ. विठ्ठल शिवणकर, उच्च शिक्षण विभागाचे सहसचिव व सावित्रीबाई फुले महिला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शिवलिंग मेनकुदळे , माध्यमिक विभागाचे सहसचिव राजेंद्र साळुंखे, महिला महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रो. डॉ. सुनिता घार्गे, उपप्राचार्य डॉ. एस. एस. पवार यांनी प्रो. डॉ. भोसले यांचे अभिनंदन केले.