महाराष्ट्र न्यूज प्रतिनिधी :
बॉलिवूडच्या प्रसिद्ध नृत्यदिग्दर्शका सरोज खान यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले आहे. मुंबईच्या वांद्र्यातील गुरुनानक रुग्णालयात त्यांनी वयाच्या 71 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला.
सरोज खान यांची कोरोना चाचणीही करण्यात आली होती. ती निगेटिव्ह आली होती. मात्र गुरुवारी मध्यरात्री त्यांना अत्यवस्थ वाटू लागले आणि उपचार सुरु असताना रात्री दोनच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली. सरोज खान यांचा जन्म 22 नोव्हेंबर 1948 रोजी झाला होता. बाल कलाकार म्हणून त्यांनी आपल्या कारकीर्दीची सुरुवात केली. 50 च्या दशकात त्यांनी अनेक चित्रपटांमध्ये बॅकग्राऊंड डान्सरमधूनही काम केलं.
यानंतर त्यांनी नृत्यदिग्दर्शक बी सोहनलाल यांच्याकडून नृत्याचं प्रशिक्षण घेतले आणि ‘गीता मेरा नाम’ चित्रपटातून नृत्यदिग्दर्शिका म्हणून आपली कारकीर्द घडवली. सरोज खान यांनी माधुरी दीक्षित, श्रीदेवी, काजोल यांच्यसह अनेक अभिनेत्रींसाठी नृत्य दिगदर्शन केलं होतं.चार दशकांच्या करिअरमध्ये सरोज खान यांनी दोन हजारांपेक्षा जास्त गाण्यांसाठी नृत्यदिग्दर्शन केले आहे.