मुंबई(प्रतिनिधी)-लातूर येथील ज्येष्ठ पत्रकार गंगाधर सोमवंशी आणि गेवराई येथील पत्रकार संतोष भोसले यांचे कोरोनाचा उपचार सुरू असताना दुर्दैवी निधन झाले आहे. सरकारने आरोग्य व पोलिस कर्मचार्यांबरोबर पत्रकारांनाही कोरोना काळात कर्तव्यावर असताना विमा कवच दिले जाईल असे जाहीर केले होते. त्यानुसार कोरोना काळात दोन्ही पत्रकार मृत्युमुखी पडल्यामुळे त्यांच्या कुटुंबियांना पन्नास लाख रुपयांचे विमा कवच अंतर्गत मदत करावी अशी मागणी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष वसंत मुंडे यांनी केली आहे.
महाराष्ट्रात कोरोनाचा प्रादूर्भाव सुरू झाल्यानंतर आरोग्य आणि पोलिस कर्मचार्यांना सरकारने पन्नास लाख रुपयांचे विमा कवच जाहीर केले होते. प्रसार माध्यमांचे प्रतिनिधीही कोरोना काळात जीव धोक्यात घालून वार्तांकन करत असल्यामुळे पत्रकारांनाही विमा कवच द्यावे अशी मागणी राज्य पत्रकार संघासह पत्रकारांनी सरकारकडे लावून धरली होती. या पार्श्वभूमीवर आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी कोरोनाच्या काळात दुर्दैवाने बाधा होऊन पत्रकाराचे निधन झाले तर त्यांनाही विमा संरक्षण अंतर्गत कुटुंबियांना आर्थिक मदत दिली जाईल अशी घोषणा केली होती. जिल्हाधिकारी व जिल्हा माहिती अधिकारी यांनी मयत, पत्रकार असल्याचे स्पष्ट केल्यानंतर त्यांच्या कुटुंबियांना मदत करण्याची भूमिकाही स्पष्ट केली होती. सरकारच्या या निर्णयाचे सर्वच पत्रकारांनी स्वागत केले होते. या अनुषंगाने बीड जिल्ह्यातील गेवराई येथील दैनिक सामना वृत्तपत्रात पंचवीस वर्ष तालुका प्रतिनिधी म्हणून कार्यरत असलेले ज्येष्ठ पत्रकार संतोष भोसले(वय 48) यांचा दि. 28 जुलै रोजी जिल्हा रुग्णालयात कोव्हिड कक्षात उपचार घेत असताना मृत्यू झाला. लक्षणे जाणवू लागल्याने त्यांची कोव्हीड चाचणी करण्यात आली होती. त्यानंतरही त्यांची प्रकृती खालावल्याने मयत झाले. तर लातूर येथील ज्येष्ठ पत्रकार गंगाधर सोमवंशी (वय 61) यांचा बुधवार दि. 29 जुलै रोजी कोरोनामुळे मृत्यू झाला. सोमवंशी हे अनेक वर्षांपासून विभागीय व स्थानिक वृत्तपत्रात पत्रकार म्हणून कार्यरत होते. त्यांचा कोरोना अहवाल सकारात्मक आल्यानंतर उपचारासाठी ते खाजगी रुग्णालयात गेले. मात्र उपचारासाठी सुरुवातीलाच 75 हजार रुपये जमा करावेत आणि दररोज पाच हजार रुपयांचा खर्च येईल असे सांगितल्यानंतर हतबल झालेले सोमवंशी हे सरकारी रुग्णालयात भरती झाले. उपचार सुरू असतानाच त्यांचा मृत्यू झाला. मृत्यूपूर्वी त्यांनी उपचारासाठी लागणारे पैसे नसल्यामुळे सरकारी रुग्णालयात जावे लागल्याचे लिहून आपली आर्थिक परिस्थिती स्पष्ट केली. त्यामुळे दोन्ही पत्रकारांचा कोरोना काळात मृत्यू झाला असल्याने शासनाने घोषित केल्या प्रमाणे त्यांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत करावी. अशी मागणी लेखी निवेदनाद्वारे मुख्यमंत्र्यांकडे राज्य पत्रकार संघाच्या वतीने प्रदेशाध्यक्ष वसंत मुंडे, राज्य संघटक संजय भोकरे, प्रदेश सरचिटणीस विश्वास आरोटे, प्रदेश कार्याध्यक्ष राकेश टोळ्ये, किरण जोशी यांनी केली आहे.