महाराष्ट्र न्यूज प्रतिनिधी : शहाजीराजे भोसले(कळंब – इंदापूर )
कै.श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्तमंदिर ट्रस्टचा पुढाकार ; सलग १०० दिवसांच्या योजनेनंतर आताच्या लॉकडाऊनमध्येही सेवा सुरुच आहे.
पुणे शहर आणि उपनगरांमध्ये कोरोना रुग्णांची वाढती संख्या रोखण्याकरीता सरकारने पुन्हा एकदा लॉकडाऊन -५ घोषित केला. मात्र, बाहेरगावहून पुण्यात शिकण्याकरीता आलेल्या विद्यार्थ्यांचे पुन्हा एकदा हाल झाले. शहरातील खानावळी, हॉटेल बंद असल्याने आणि स्वत:कडे अन्न तयार करण्याचे साधन नसल्याने विद्यार्थ्यांवर उपासमारीची वेळ आली. त्यामुळे पुन्हा एकदा बुधवार पेठेतील कै.श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्तमंदिर ट्रस्टने विद्यार्थ्यांना दुपारचे भोजन देण्यास सुरुवात केली आहे.
मार्च महिन्यातील लॉकडाऊन झाल्यापासून सलग १०० दिवस देखील ही योजना कार्यरत होती. त्यामध्ये दररोज १०० हून अधिक विद्यार्थ्यांना भोजन दिले जात होते. त्यानंतर शहर अनलॉकची प्रक्रिया सुरु झाल्याने ही योजना थांबविण्यात आली. मात्र, आजपासून पुन्हा लॉकडाऊन झाल्याने विद्यार्थ्यांच्या मदतीला ट्रस्ट धावून आले आहे.
ट्रस्टचे उत्सवप्रमुख शिरीष मोहिते म्हणाले, कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्याकरीता अनेक उपाययोजना केल्या जात आहेत. मात्र, याचा सर्वाधिक फटका पुण्यामध्ये बाहेरील गावांतून आलेल्या विद्यार्थ्यांना बसला आहे. बाजारपेठ, हॉटेल्स, खानावळी बंद असल्याने दैनंदिन जेवणाचा प्रश्न समोर आला होता. त्यामुळे लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्तमंदिरतर्फे अशा विद्यार्थ्यांकरीता भोजन सहाय्य योजना पुन्हा एकदा सुरु केली आहे.
ट्रस्टचे अध्यक्ष ॲड. शिवराज कदम जहागिरदार म्हणाले, कोरोना विषाणुंचा प्रादुर्भाव रोखण्याच्या पार्श्वभूमीवर पुणे शहरातील अभ्यासिकांमध्ये असलेल्या परगावच्या विद्यार्थ्यांना निबंर्धांमुळे खानावळी बंद झाल्याने ट्रस्टतर्फे दुपारचे जेवण पार्सल स्वरूपात देण्यात येत आहे. तयार भोजन पार्सल नेताना परगावचे रहिवासी असल्याचा पुरावा (आधार कार्ड) व अभ्यासिका ओळखपत्राची झेरॉक्स प्रत मंदिरात दाखवून विद्यार्थ्यांची पूर्वनोंदणी करून ही सेवा दिली जात आहे. या उपक्रमाकरीता देणगीदारांनी देखील देणगीच्या स्वरुपात सहकार्य करावे, असे आवाहनही त्यांनी केले. विद्यार्थ्यांनी देखील या योजनेबद्दल ट्रस्टचे आभार व्यक्त केले आहेत.