सातारा दि.25 माझे कुटुंब माझी जबाबदारी ही मोहिम कोरोना संसर्ग रोखण्यास मोठी भूमिका बजावेल. या मोहिमेत जनतेचा मोठ्या प्रमाणात सहभाग घेऊन ही मोहिम एक लोकचळवळ करा, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज केले.मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांनी आज माझे कुटुंब माझी जबाबदारी या मोहिमेचा दृकश्राव्याप्रणालीद्वारे आढावा घेतला. यावेळी ते बोलत होते. या आढावा बैठकीला पालकमंत्री बाळासाहेब पाटील, जिल्हाधिकारी शेखर सिंह, मुख्य कार्यकारी अधिकारी संजय भागवत, पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते, अपर जिल्हाधिकारी रामचंद्र शिंदे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठल्ये आदी उपस्थित होते.कोणतीही मोहिम यशस्वी होण्यासाठी त्यामध्ये जनतेचा मोठ्या प्रमाणात सहभाग असायला हवा. आज आपण जनजागृतीद्वारे कोरोना संकटाचा प्रभावीपणे सामना करु शकतो. मास्क वापरणे, वारंवार हात धुणे आणि विशिष्ट अंतर पाळण्यावर भर दिला पाहिजे.
यावर्षीचा गणेशोत्सव सर्वांनी शांतपणे साजरा केला. आगामी नवरात्र महोत्सव शांततेत पार पाडावा, असे आवाहनही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी.माझे कुटुंब माझी जबाबदारी मोहिम जिल्ह्यात प्रभावीपणे राबविण्यात येत असून जनतेचाही मोठा प्रतिसाद मिळत असल्याचे सांगून पालकमंत्री बाळासाहेब पाटील पुढे म्हणाले, सातारा येथील छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयात कोविड रुग्णालय उभारण्यात आले आहे. या हॉस्पीटलचे काम अंतिम टप्प्यात असून या रुग्णालयाला आणखीन निधीची गरज आहे तो निधी उपलब्ध करुन द्यावा.
तसेच प्रत्येक ग्रामपंचायत स्तरावर कोरोना संसर्गाचा रुग्ण आढळल्यास त्यावर तात्काळ गावातच तात्पुरता उपचार मिळावा यासाठी छोटे-छोटे हॉस्पीटल सुरु करण्यात यावेत यामुळे रुग्णाची भिती कमी होईल, असेही पालकमंत्री श्री. पाटील यांनी या आढावा बैठकीत सांगितले.माझे कुंटुब माझी जबाबदारी ही मोहिमेंतर्गत जिल्ह्याचा 16 टक्के भागाची तपासणी करण्यात आली आहे. पुढील यापुढे ही मोहिम अधिक गतीने राबविण्यात येणार असून या मोहिमेंतर्गत कोरोना संसर्गाच्या जनजागृतीबाबत निबंध स्पर्धा, निबंध स्पर्धा, फाटोग्राफी स्पर्धा यासह अनेक स्पर्धांचे आयोजन करण्यात येणार आहे. तसेच जनजागृतीसाठी पालकमंत्री जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी, तज्ञ डॉक्टर यांच्या मुलाखती घेऊन त्या आकाशवाणीवरुन प्रसारित करण्यात येणार आहेत.
तसेच होर्डींगद्वारेही प्रसिद्धी करण्यात येणार आहे. माझे कुटुंब माझी जबाबदारी या मोहिमेंतर्गत जिल्ह्यातील 6 लाख 80 हजार कुटुंबना भेटी देणार असून यासाठी 974 पथके तयार करण्यात आल्याचे जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी या आढावा बैठकीत सांगितले.