पाटण /प्रतिनिधी
राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या कोयना धरणाचे सहा वक्र दरवाजे अखेर स्वातंत्र्यदिनी उघडले असून धरणातून पाण्याचा विसर्ग सुरु करण्यात आला आहे, कोयना धरण पाणलोट क्षेत्रात गेल्या काही दिवसांपासून सलगतेने पाऊस पडत असल्याने धरणाच्या शिवसागर जलाशयातील पाणीसाठ्यात वाढ होत असल्याने स्वातंत्रदिनाच्या दिवशीच सकाळी 11 वाजता कोयना धरणाचे सहा वक्र दरवाजे पावणे दोन फुटांनी उचलून कोयना नदीपात्रात प्रतिसेकंद सुमारे 10140 क्यूसेक्स वेगाने पाण्याचा विसर्ग सोडण्यात आला आहे.
गेल्या काही दिवसांपासून कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस कोसळत आहे, धरणात येणाऱ्या पाण्याची आवक वाढतच आहे, शनिवारी सकाळी धरणाची पाणीपातळी 2147.11 फूट आणि 86 टीएमसी झाल्यामुळे धरणातील पाणीपातळी निर्धारित करण्यासाठी धरण व्यवस्थापनाने पाणी सोडण्याचा निर्णय घेतला, शनिवारी सकाळी 11 वाजता कोयना धरणाचे सहा वक्र दरवाजे 1 फूट 9 इंचाने उचलून कोयना नदीपात्रात 9360 क्यूसेक्स आणि पायथा विजगृहातून 1050 असे मिळून एकूण 10140 क्यूसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला .कोयना नदीपात्रात सुरू केलेल्या या विसर्ग आणि कोसळणारा पाऊस यामुळे कोयना नदीच्या पाणीपातळीत लक्षणीय वाढ झाली असल्याने कोयना नदीच्या काठावरील गावांना प्रशासनाच्या वतीने सतर्कतेचा इशारा दिला आहे.
कोयना धरण परिसरात भुकंपाचा धक्का
कोयना धरण परिसराला शनिवारी सकाळी 10 वाजून 22 मिनिटांनी 3.1 रिश्टर स्केलचा भूकंपाचा सौम्य धक्का बसला., हा धक्का कोयना, पाटण परिसरात जाणवला, भुकंपाचा केंद्रबिंदू वारणा खोऱ्यात चिखली गावाच्या ईशान्येस 10 कि.मी अंतरावर होता. मात्र या धक्याने कोणतीही जीवित अथवा वित्तहानी झाली नसून कोयना धरण सुरक्षित असल्याची माहिती प्रशासनाने दिली.






















