महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या औरंगाबाद विभागीय कार्यालयाचा नुतनीकरण शुभारंभ
औरंगाबाद(प्रतिनिधी)-उत्पादन खर्च दहा रुपये आणि विक्री मात्र दोन रुपयात केवळ वर्तमान पत्र व्यवसायातच होते. जाहिरातीचे अतिरिक्त उत्पन्न गृहित धरुन अंकाची किंमत उत्पादन खर्चाच्या तीस टक्के ठेवली जाते. मात्र कोरोनाचे संकट आणि समाज माध्यमांचा वाढता प्रभाव लक्षात घेता जाहिरातीचे अतिरिक्त उत्पन्न बंद झाल्यामुळे वर्तमान पत्र व्यवसायच अडचणीत आला असल्याने सरकारने या व्यवसायाला लघू उद्योगाचा दर्जा द्यावा आणि वृत्तपत्र चालकांनीही आता विक्री किंमत वाढवली तरच हे माध्यम क्षेत्र टिकेल असे मत महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष वसंत मुंडे यांनी व्यक्त केले.
औरंगाबाद येथील महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या मराठवाडा विभागीय कार्यालय नुतनीकरणानंतर शनिवार दि. 22 ऑगस्ट रोजी प्रदेशाध्यक्ष वसंत मुंडे यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यालयाचा शुभारंभ झाला. यावेळी शहर जिल्हाध्यक्ष प्रा.डॉ.प्रभू गोरे यांच्या हस्ते सपत्नीक सत्यनारायण महापुजा करण्यात आली. यावेळी महानगर शहराध्यक्ष अनिल सावंत, ग्रामीण जिल्हाध्यक्ष प्रशांत क्षीरसागर, विभागीय संघटक वैभव स्वामी यांच्यासह पत्रकारीता, राजकीय, सामाजिक, उद्योग, शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थिती लावली. यावेळी उपस्थित संघाचे पदाधिकारी आणि पत्रकारांशी संवाद साधताना माध्यम क्षेत्रासमोरील समस्या आणि संघटनेच्या ध्येयधोरणांचे मुक्त चिंतन प्रदेशाध्यक्ष वसंत मुंडे यांनी केले. जगाच्या पाठीवर उत्पादन खर्च दहा रुपये
असताना दोन रुपयांमध्ये कुठलीही वस्तू विकली जात नाही. केवळ वर्तमान पत्र हा एकाच व्यवसायात उत्पादन खर्चाच्या तीस टक्क्केच किंमतीत अंक विकला जातो. जाहिरातीच्या माध्यमातून उत्पादन आणि विक्री खर्चातील तफावत भरुन काढली जाते. मात्र समाज माध्यमांचा वाढता प्रभाव आणि कोरोनाचे संकट यामुळे जाहिरातीतून मिळणारे उत्पन्न कमी झाल्याने वर्तमान पत्र हे माध्यम अडचणीत आले आहे. तर सरकारनेही जाहिराती कमी केल्या. तर कागदाचे दर, जीएसटी आणि इतर वस्तुंचेही दर वाढल्यामुळे वर्तमान पत्र हा व्यवसायच आता आतबट्ट्याचा खेळ झाला आहे. कोरोनामुळे चारच महिन्यात मोठी वृत्तसमुह हे अडचणीत आल्यामुळे अनेकांनी आवृत्त्या बंद करुन पत्रकारांसह इतर विभागातील कर्मचार्यांना कमी केले आहे. त्यामुळे हा व्यवसाय टिकवण्यासाठी आता वृत्तपत्र चालकांना विक्री मुल्य वाढवण्याचा विचार करावा लागेल. तर दुसरीकडे सरकारनेही या क्षेत्राला मदत करण्याची गरज निर्माण झाली आहे. इतर व्यवसायाप्रमाणेच वृत्तपत्र व्यवसायालाही सरकारने लघू उद्योगाचा दर्जा देऊन सवलती दिल्या तर विभाग आणि जिल्हा पातळीवरील लघू वृत्तपत्रांना याचा चांगला फायदा होऊ शकतो. त्यासाठी सरकारकडे मागणी करण्यात आली आहे. माध्यम क्षेत्र अडचणीत आल्याने या क्षेत्रात कार्यरत असलेल्या एका पिढीसमोरच बेरोजगारीचे संकट उभे राहिले आहे. तर या क्षेत्राची एकूण आर्थिक वाताहात लक्षात घेता नवी पिढी आता या क्षेत्राकडे यायला तयार नाही. शेतकरी व पत्रकार या दोनच घटकांना मदत करण्यासाठी सरकार पुढे येत नाही, हे दुर्दैव आहे. सरकारने पत्रकारांनाही अनुदान, विमा कवच द्यावे. तसेच छोटी वृत्तपत्र टिकवण्यासाठी जाहिराती आणि दर वाढवून द्यावा. यासाठीही संघटनेच्या माध्यमातून प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. समाज माध्यमांचा प्रभाव वाढला असला तरी सर्वसामान्य जनतेचा वर्तमान पत्रातील बातमीवरच विश्वास असल्याचेही त्यांनी नमूद केले. महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे राज्य संघटक संजय भोकरे यांच्या नेतृत्वाखाली राज्यातील पत्रकारांचे संघटन मजबूत करताना सहाही विभागात स्वतंत्र विभागीय कार्यालय सुरू करण्यात आली आहेत. औरंगाबाद येथील विभागीय कार्यालयामुळे आता पदाधिकारी व पत्रकारांना याचा चांगला फायदा होईल. कार्यालयाच्या माध्यमातून या क्षेत्रात अधिक चांगल्या पध्दतीने काम व्हावे अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. यावेळी संघटनेचे औरंगाबाद जिल्हा सचिव दिपक मस्के, जिल्हा संघटक विलास शिंगी, जिल्हा कोषाध्यक्ष मुकेश मुंदडा, जिल्हा उपाध्यक्ष छबुराव ताके, महानगर उपाध्यक्ष हनुमंत कोल्हे, जिल्हा प्रसिद्धी प्रमुख सचिन अंभोरे, सदस्य अशोक वानखेडे, रमाकांत कुलकर्णी, प्रशांत सूर्यतळे, सुनिल मुढेकर, जितेंद्र खाडे, गुलाब पठाण, शैलेश साबू, सतिश मस्के, आनंद अंभोरे, भास्कर निकाळजे, बबन सोनवणे आदि उपस्थित होते.
मान्यवरांच्या भेटी
नुतनीकरण कार्यालयाला माजी मंत्री आमदार अतुल सावे, भाजपचे मनोज भारस्कर, शिवसेनेचे दिग्विजय शेरखाने, ज्येष्ठ पत्रकार सुधीर कोर्टीकर, शिवसेना शाखा प्रमुख प्रशांत देशमुख, ज्येष्ठ पत्रकार शेषेराव पठाडे आदिंनी भेट दिली.