महाराष्ट्र न्यूज प्रतिनिधी : शहाजीराजे भोसले (कळंब – इंदापूर)
भगवंताला सगुण रुपात बघणे.. त्याची पूजाअर्चना करणे , आरती करणे यामुळे भक्तजन सुखावतात . श्री गणरायाच्या आगमनाने घरोघरी निर्माण झालेल्या भक्तीभावाने आज भक्तांचा आनंद व्दिगुणीत होत आहे तो गौरींच्या आगमनाने . कुठे गौरीचे कुठे महालक्ष्मी म्हणून स्वागत होते . प्रांतवार नावे वेगळी.. स्वरुप वेगळे असले तरी भक्तीभाव मात्र तोच असतो .
या महिन्यात वरुण राजाने धरतीवर कृपा केलेली असते.. संतृप्त मनाने राने.. वने.. शेतीवाडी बहरलेली असते.. तर रंगीबेरंगी फुला फळानी बागा बहारलेल्या असतात . अशावेळी या श्रीमंत धरतीवर संपन्न मनाने या गौरींचे उल्हासात स्वागत होते. हो , कारण त्या आज माहेरी आल्या आहेत .
आपल्या पुराणकथा या मानवाचे नाते चक्क देवादिकांशी जोडून त्यांच्याविषयी आणि व्यक्तीविषयीही ममत्व निर्माण करतात . मग लहान बालके राम.. कृष्ण.. राधा होतात तर माहेरवासीणींचा गौरी म्हणून आजन्म सन्मान होतो .
हर्षोल्हासी मने मग या गौरींच्या माहेरपणात कोणतीच उणीव ठेवत नाहीत . सजावट , भरजरी साड्या असो वा दागिने.. अलंकार , गौरींच्या आवडीचे पदार्थ अशी सगळी हौस भागविणारच . सासरी गेलेल्या मुलींना पण यानिमित्त माहेरपणाची संधी लाभते. या आनंदात विखुरलेले कुटुंबीय तर एकत्र येतातच , शिवाय आप्तस्वकीय गावकरीही दर्शनासाठी येतात .
गौरींचे मुखवटे बाहेरुन कुंकूम पाउल खुणासह , कुठे दारा बाहेरुन तर कुठे नदी , समुद्रापासून वाजत गाजत मिरवून आणत घराच्या प्रत्येक खोलीतून मिरवले जातात . गौरीकृपेने घर मुबलक धनधान्यान्याने भरलेले राहो.. घरात सुख , शांती , समाधान , ऐश्वर्य राहो.. अखंड सौभाग्य लाभो ही धारणा .
चल ग सई चल ग बाई
गौराई आल्यात सोन्याच्या पायी
गौराई तुमची पुण्याई मोठी
चढून यावं अंगण ओटी
तुमच्या सांगाती लक्ष्मी येई
गौराई तुमचे पाऊलठसे
घरात दारात उठले कसे
सुखाची बरसात अवघ्या ठायी
गौराई कोठीत पाऊल ठेवा
धान्यानं कुणगा भरून जावा
धनाला आता कमती नाही
सैपाकघरात गौराई बसा
चुलीला द्यावा अन्नाचा वसा
सुखाचा घास मुखात जाई
हातात चुडा कपाळी कुंकू
तुमच्या कृपेनं काळाला जिंकू
झुकते पायी , ठेवते डोई
गीत : शांता शेळके
संगीत : बाळ पळसुले
स्वर : आशा भोसले
चित्रपट : सासुरवाशीण (१९७८)
गणपती बाप्पा मोरया
!! नियम पाळा !! सुरक्षित रहा !!