विद्यार्थी व पालकांच्यामध्ये संभ्रमावस्था
महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसातारा, दि. ११ जानेवारी : मार्च-एप्रिल मध्ये होणाऱ्या दहावी-बारावीच्या परीक्षा नियोजीत वेळापत्रकानुसारच घेतल्या जातील, असे महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी स्पष्ट केले. मात्र, ओमायक्रोन आणि कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने दि. १० लागू केलेल्या निर्बंधानुसार संपूर्ण राज्यातील शाळा व कनिष्ठ महाविद्यालये १५ फेब्रुवारीपर्यंत बंद असल्याने इयत्ता १२ वीच्या प्रात्यक्षिक परीक्षा आणि इतर नियोजन करताना अनेक अडचणी येणार आहेत. प्रात्यक्षिक परीक्षा कशी होणार? या चिंतेने विद्यार्थी पालक आणि शिक्षक संभ्रमावस्थेत आहेत. गेल्या वर्षी दहावी-बारावी परीक्षा कोरोना संसर्गामुळे रद्द करण्यात आल्या होत्या. अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे विद्यार्थ्यांचा निकाल जाहीर करण्यात आला होता. चालू वर्षी १५ जून पासून विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षण देण्यात आले. कोरोनाचा संसर्ग कमी झाल्यावर ४ ऑक्टोबर, २०२१ पासून शासनाच्या परवानगीने ९ वी ते १२ चे वर्ग सुरू झाले. काही दिवसांपूर्वी राज्य शिक्षण मंडळाने दहावी आणि बारावीच्या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर केले. त्याप्रमाणे ४ मार्चला बारावीची तर १५ मार्चपासून दहावीची लेखी परीक्षा सुरू होणार आहे. राज्यभरातून दहावी आणि बारावीचे मिळून सुमारे 32 लाख विद्यार्थी परीक्षेला सामोरे जाणार आहेत. कोल्हापूर विभागातील दोन्ही मिळून २ लाख ७५ हजार विद्यार्थी परीक्षेला बसणार आहेत. १२ फेब्रुवारीपासून बारावीच्या प्रात्यक्षिक, तोंडी व श्रेणी परीक्षा सुरू होणार आहेत. परंतु, १५ फेब्रुवारीपर्यंत शाळा-महाविद्यालये बंद असल्याने या सर्व परीक्षांचे नियोजन करताना शाळा-महाविद्यालयांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागणार आहे. त्यातच दहावी-बारावीच्या काही विषयांचा अभ्यासक्रम अद्याप पूर्ण झालेला नाही. यावर्षी २५ टक्के अभ्यासक्रम कमी केलेला आहे. परीक्षेची काठिण्य पातळी कमी करण्याची मागणी विद्यार्थी व पालकांच्या मधून होत आहे. प्रत्यक्षात चालू शैक्षणिक वर्षात केवळ दोनच महिने शाळा, महाविद्यालयांत उपस्थित राहून विद्यार्थ्यांना शिक्षण घेता आले. जून पासून ऑक्टोबर पर्यंत ऑनलाईन, त्यानंतर जानेवारीपर्यंत ऑफलाइन शिक्षण विद्यार्थ्यांना मिळाले. आता पुन्हा ऑनलाइन शिक्षण घ्यावे लागणार असल्याने विद्यार्थी गोंधळात पडले आहेत. त्यांचे शैक्षणिक नुकसान होणार आहे.
*** ज्या-त्या वेळची परिस्थिती पाहून निर्णय बारावीच्या प्रात्यक्षिक परीक्षांचे अंतर्गत नियोजन करण्याची शाळांना व कनिष्ठ महाविद्यालयांना अधिकार आहेत. दहावी बारावीची लेखी परीक्षा नियोजित वेळापत्रकानुसारच होतील परंतु ज्या-त्या वेळची परिस्थिती पाहून निर्णय घेतला जाईल. – शरद गोसावीअध्यक्ष, राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, पुणे.
*** शाळा, कनिष्ठ महाविद्यालये १५ फेब्रुवारी पर्यंत बंद आहेत. अद्यापही विज्ञान विषयाचा अभ्यासक्रम पूर्ण झालेला नाही. यामुळे अभ्यास व सरावास कमी वेळ मिळणार आहे. त्यातच कोरोनामुळे पुन्हा परीक्षा होणार की नाही, हे अनिश्चित असल्याने परीक्षेचे टेन्शन वाढले आहे. – खुशी धोंडवड विद्यार्थिनी (बारावी)






















