महाराष्ट्र न्यूज प्रतिनिधी(वडगाव निंबाळकर) :संतोष भोसले
वडगाव निंबाळकर (ता.बारामती) परिसरात (दि.9) रात्री ढगफुटी सारखा पाऊस झाल्याने सर्वत्र पाणीच पाणी झाले. या मुसळधार पावसाने परिसरातील ओढ्यानाल्याला पूर आला आणि ओढ्यालगतच्या सुमारे 150 घरामध्ये पुराचे पाणी शिरले, पूरस्थिती निर्माण परिसरातील नागरिकांना रात्र जागून काढावी लागली.
वडगाव परिसरातील वाकी, चोपडज, होळ, कोऱ्हाळे या गावामध्ये कालरात्री जोरदार पाऊस झाला. त्यामुळे सगळीकडे पाणीच पाणी झाले. वाकी तलाव पूर्ण क्षमतेने भरल्यामुळे तलावात आलेले पावसाचे पाणी सांडव्यातून ओढ्यात आले. ओढापात्र पूर्णक्षमतेने वाहू लागले. वाकी चोपडज येथील ओढ्यालगतच्या घरांमधून पाणी शिरले. पुढे वडगाव निंबाळकर परिसरात पाण्याचा प्रवाह मोठा झाल्यामुळे पाण्याचा वेग वाढला, परिणामी ओढ्याला नदीचे स्वरूप आले. येथील बाजार तळावरील सर्व ओठे पाण्याखाली गेले. दरम्यान प्राथमिक आरोग्य उपकेंद्राची संरक्षण भिंत, व्यायाम शाळेची संरक्षक भिंत तीव्र प्रवाहामुळे पडली. इतर काही ठिकाणी भिंत कोसळण्याचे प्रकार घडले.
सुमारे 150 घरांमध्ये पुराचे पाणी शिरले. ओढ्यानाल्यांना पूर आल्याने गावातील रस्त्यांवर पाणी आले होते. गावातील बाजारतळ, पांढरीकडे जाणाऱ्या रस्त्यावरील पुल पाण्याखाली गेला आहे. यामुळे रस्त्यावरील वाहतूक बंद झाली. काही भागात काही काळासाठी तर काही भागात रात्रीपासून वीजपुरवठा खंडित करण्यात आला. रात्रीच्या वेळी हा सर्व प्रकार घडल्यामुळे नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्यासाठी वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सोमनाथ लांडे आणि पोलीस कर्मचारी यांनी घटनास्थळी धाव घेतली. आणि सर्वांना सुरक्षित स्थळी नेण्याचे काम केले. पहाटे सुमारास प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे, तहसीलदार विजय पाटील, पाटबंधारे अभियंता प्रविण घोरपडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे बारामती तालुका अध्यक्ष संभाजी होळकर, मंडलअधिकारी संजय माने, तलाठी रविंद्र कदम, माजी सरपंच सुनील ढोले, निलेश मदने, नानासो मदने यांनी ओढापात्राची वाकी तलावापर्यंत जाऊन संपूर्ण पाहणी केली. सध्या परिसरात अजूनही हवामान ढगाळ असल्याने एकंदर पुन्हा पावसाची शक्यता वर्तवली जात आहे.