नवारस्ता प्रतिनिधी : अहमदनगर जिल्ह्यातील ऊक्कडगावात सामान्य कुटुंबात जन्म घेतलेला किशोर अनिल जेठे यांनी खडतर शिक्षणाचा प्रवास करून महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वतीने घेण्यात आलेल्या परीक्षेत यश मिळवत कक्ष अधिकारी (राजपत्रित वर्ग-2) या पदाला गवसणी घातली आहे. या यशामुळे अहमदनगर जिल्ह्यातील ऊक्कडगाव मधील जनतेचा आनंद गगनाला भिडला आहे. किशोर यांचे वडील अनिल जेठे सध्याचे वास्तव्य आंबेगाव हे पीएमटी (पुणे) येथे चालक म्हणून कार्यरत असल्याने किशोर यांचे शिक्षणही पुण्यातच झाले. शिक्षणाची व अभ्यासाची आवड असणाऱ्या किशोर जेठे यांनी २०१७ ला डिग्री पास केली. एकूणच बिई मेकॅनिकल ची डिग्री घेऊन किशोर गप्प बसला नाही. डिग्री चा डंका वाजविल्यानंतर एमपीएससीची तयारी सुरू केली.
अनेक अडचणींना सामना करत आपली एमपीएससी ची तयारी चालू ठेवली असतानाच दरम्यान कोरूना काळात परीक्षा रद्द होऊन सुद्धा न खचता एकलव्याप्रमाणे आपला अभ्यास सातत्याने चालू ठेवून अखेर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या राज्यसेवा २०२० च्या परीक्षेत कक्ष अधिकारी म्हणून निवड झाली. किशोर जेठे यांच्या या निवडीबद्दल त्यांचा संपूर्ण मित्र परिवार तसेच अहमदनगर जिल्ह्यातून विविध स्तरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे.