फलटण : मालोजी नगर कोळकी येथील प्रभाग 3 मधील सटवाई मंदिरा समोरील भुयारी गटार योजना गेल्या सहा महिन्यापासून अर्धवट अवस्थेत आहे. मार्च महिना संपण्यापूर्वी सुमारे 200 मीटरची पाईपलाईन बसविण्यात आली आहे. पण त्या भागातील येणारे सांडपाणी कोठे सोडावयाचे याचे नियोजन ग्रामपंचायतीने केलेले नाही.त्यामुळे त्या ग्रामस्थांना त्यांच्या प्लॉटमधील सांडपाणी वाहक पाईप मुख्य पाईप लाईनला अजून जोडण्यात आलेले नाही.गेली वीस वर्षे ग्रामस्थ त्याठिकाणी वास्तव्यास असून वेळेवर कराची रक्कम भरूनही ते मूलभूत सुविधेपासून वंचित राहिलेले आहेत. यापूर्वी ग्रामसभेत त्याबाबत पोकळ आश्वासने दिली गेलेली आहेत.त्यामुळे कोळकी ग्रामपंचायतीचा भोंगळ कारभार समोर येत आहे.
फलटण पंचायत समितीच्या सदस्याच्या निधीमधून या पाइपलाइनचे काम करण्यात आले असल्याचे सांगण्यात येते. पण पुढील कार्यवाहीसाठी पंचायत समितीतर्फे निधी उपलब्ध झालेला नाही. एक/ दोन ठिकाणी त्या पाईप लाईन ला इतर ठिकाणची पाईप लाईन जोडण्याचे काम करायचे आहे. सातारा जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी( ग्रामपंचायत) यांनी या संदर्भात फलटण पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्यांना 27 जानेवारी 21(जा. क्र.905/2021) आणि तत्पूर्वी 29 एप्रिल 20 (जा.क्र. 2656/19) रोजी अशा दोन पत्रान्वये सदर भागातील काम पूर्ण करण्यासाठी सूचना दिल्या असतानाही ते काम अध्याप पूर्ण झालेले नाही.
गट विकास अधिकारी यांच्यातर्फे सदर कामाच्या पूर्णत्वासाठी वर्क ऑर्डर ही काढण्यात आलेली नाही. त्यामुळे संबंधित ग्रामस्थांच्या समाधाना करिता पाईपलाईन ची अर्धवट कार्यवाही करण्यात आल्याचे मत संबंधित व्यक्त करताना आढळतात. हे काम पंचायत समितीतर्फे करण्यात येत असल्याने आमचा त्याच्याशी काही संबंध नाही अशी भूमिका कोळकी ग्रामपंचायतीने घेतलेली आहे. त्यामुळे अर्धवट काम कधी पूर्ण होणार याकडे ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.
गेले सहा महिने केवळ तोंडी आश्वासने दिली जात आहेत.जिल्हा विधी समिती मार्फत सातारा जिल्हा परिषदेकडे पाठपुरावा करूनही उपयोग झालेला नाही. ज्याप्रमाणे कामासाठी अर्ज केला त्याप्रमाणे त्यांच्याकडून निधी उपलब्ध करून आणला असता, तर बरे झाले असते असे पंचायत समितीच्या अधिकाऱ्यांनी संबंधित अर्जदाराकडे विचारणा केली आहे. कोळकीतील इतर विकास कामासाठी याच पद्धतीने पंचायत समितीने निधी आणला आहे किंवा, कसे हे कळावण्यात मात्र मार्ग नाही अशी कडवट प्रतिक्रिया संबंधितांनी व्यक्त केली आहे.