सातारा जिल्ह्यात पाटण सेतू कार्यालय अव्वल
पाटण : शासकीय यंत्रणेने मनात आणल्यास अशक्य गोष्टीही शक्य होऊ शकतात, हे पाटण चे तहसीलदार व सेतू कार्यालयातील त्यांच्या टीमने शुक्रवारी – शनिवारी दाखवून दिले. ज्या उत्पन्नाच्या दाखल्यासाठी अन्य वेळी १५ दिवस लागतात ते शनिवारी सुट्टी असूनही विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीसाठी आवश्यक असलेले २९५ दाखले दोन दिवसात देण्यात आले. त्यामुळे तहसीलदार व सेतू कार्यालयातील टीमचे तालुक्यातील पालक, सातारा जिल्हा परिषद शिक्षण विभाग, पाटणच्या शिक्षण विभागाने कौतुक करून आभार मानले आहेत. दोन दिवसात २९५ दाखले देऊन पाटण सेतू कार्यालय सातारा जिल्ह्यात अव्वल ठरले आहे, असे पाटण तालुका मुख्याध्यापक संघटनेचे अध्यक्ष विजयकुमार शिर्के यांनी सांगितले.
शिक्षण संचालकांनी ९ डिसेंबर पासून तीन वेळा आदेश काढून जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या शिक्षण विभागाच्या अक्षम्य दिरंगाईमुळे शिक्षण संचालकांच्या तंबीनंतर राष्ट्रीय आर्थिक दुर्बल (एनएमएमएस) घटकातील शिष्यवृत्ती परीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांना सारथी महामंडळाच्या शिष्यवृत्तीसाठी जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या शिक्षण अधिकाऱ्यांनी तातडीने २ दिवसात तहसीलदार यांचे उत्पन्नाचे दाखले जमा करण्याचे आदेश दिले होते. त्यामुळे अचानक उत्पन्नाच्या दाखल्यांसाठी शिक्षक, पालकांसह विद्यार्थ्यांची मोठी तारांबळ उडाली. उत्पन्नाच्या दाखल्यासाठी पाटण तहसील कार्यालय परिसरात रात्री उशिरापर्यंत विद्यार्थी – पालकांची गर्दी झाली. शिक्षण विभागाच्या या कारभाराचा फटका पालकांसह विद्यार्थ्यांना बसण्याची शक्यता निर्माण झाली होती. मात्र विद्यार्थ्यांचे शैक्षणिक व आर्थिक नुकसान होऊ नये, या उद्देशाने पाटणच्या सेतू कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी दोन दिवस अहोरात्र प्रयत्न केले. शिक्षकांची अक्षम्य दिरंगाई
सुमारे दोन महिन्यांपासून सातारा जिल्हा परिषद शिक्षण विभाग व पाटणच्या गटशिक्षणाधिकाऱ्यांना, शिक्षकांना व्हाट्सएपच्या ग्रुपवर याबाबत सातत्याने मेसेज पाठवून याबाबत सूचना दिल्या होत्या. मात्र मुदत संपत आल्यानंतर जागे झालेल्या मुख्याध्यापक, शिक्षकांनी राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटकातील (एनएमएमएस) शिष्यवृत्ती परीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांना सारथी महामंडळाच्या शिष्यवृत्तीसाठी तातडीने २ दिवसात तहसीलदार यांचे उत्पन्नाचे दाखलदाखल जमा करा, असे वैयक्तिक फोन करुन विद्यार्थी व पालकांना सांगायला सुरुवात केली. त्यामुळे उत्पन्नाच्या दाखल्यांसाठी विद्यार्थी व पालकांची एकच तारांबळ उडाली. उत्पन्नाचे दाखले काढण्यासाठी शुक्रवारपासून पाटण तहसील कार्यालय परिसरातील सेतूमध्ये रात्री उशिरापर्यंत गर्दी झाल्याचे दिसून येत होते.
तहसीलदार पाटील यांची टीम लागली कामाला
विद्यार्थ्यांचे शैक्षणिक आर्थिक नुकसान होऊ नये यासाठी गटशिक्षणाधिकारी यांच्या विनंतीवरून आपण तलाठी, संबंधित कर्मचाऱ्यांना तातडीने दाखले सोडण्याचे आदेश दिले आहेत. सारथी शिष्यवृत्ती २०२०-२१ साठी एकूण विद्यार्थी ३६७ असून त्यापैकी सर्वसाधारण प्रवर्ग २९२, SEBC -२७, असे एकूण ३१९ विद्यार्थी आहेत. त्यातील शुक्रवारी शनिवारी २९५ दाखले दिले असून उर्वरित वेळेत दिले जातील, अशी माहिती तहसीलदार रमेश पाटील यांनी दिली.
शिक्षण विभागाने मानले आभार
शुक्रवार आणि शनिवार या दोन दिवसात तहसीलदार पाटील व सेतू कार्यालयातील पूर्ण टीमने अविश्रांत मेहनत घेऊन २७२ विद्यार्थ्यांचे उत्पन्नाचे दाखले दिले आहेत. इतक्या कमी कालावधीत तात्काळ व विद्यार्थ्यांना लाभ मिळावा म्हणून तहसीलदार पाटील यांनी सेतू कार्यालयातील टीमने केलेल्या सहकार्याबद्दल आम्ही ऋणी आहोत, असे पाटण तालुका मुख्याध्यापक संघटनेचे अध्यक्ष विजयकुमार शिर्के यांनी आभार मानून सांगितले.