महाराष्ट्र न्यूज प्रतिनिधी महाबळेश्वर:
महाबळेश्वर हे देशातील प्रमुख पर्यटनस्थळ असून अद्याप या पर्यटनस्थळास पर्यटनस्थळाचा दर्जा प्राप्त झाला नव्हता. महाबळेश्वर गिरिस्थान नगरपरिषदेमार्फत दि. 13 जुलै 2019 रोजी ‘ब’ वर्ग पर्यटनस्थळाचा दर्जा प्राप्त होण्यासाठी परिपूर्ण प्रस्ताव सादर करण्यात आला होता. त्यानुसार महाराष्ट्र शासन पर्यटन व सांस्कृतिक विभागाचा निर्णय दि. 28 सप्टेंबरनुसार महाबळेश्वरला ‘ब’ वर्ग पर्यटनस्थळ दर्जा प्राप्त झाला आहे.
याबाबत नगराध्यक्षा सौ. स्वप्नाली शिंदे म्हणाल्या, महाबळेश्वर पर्यटनस्थळास अद्याप पर्यटनस्थळाचा दर्जा प्राप्त झाला नव्हता. सत्ता उपभोगलेल्या कोणत्याच नगराध्यक्षांनी कधी तसा प्रयत्नही केला नव्हता. महाबळेश्वर गिरिस्थान नगरपरिषदेमार्फत दि. 13 जुलै 2019 रोजी ‘ब’ वर्ग पर्यटनस्थळाचा दर्जा प्राप्त होण्यासाठी परिपूर्ण प्रस्ताव सादर करण्यात आला होता. महाराष्ट्र शासनाची मंजुरी मिळवण्यासाठी सर्व निकषांची वेळोवेळी पूर्तता करण्यात आली होती. या प्रस्तावास मान्यता मिळण्यासाठी मी नगराध्यक्षा म्हणून व कुमार शिंदे यांनी सातत्याने पाठपुरावा केला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे महाबळेश्वर दौर्यावर आल्यावर समक्ष भेट घेऊन हा विषय प्रलंबित असल्याबाबत सांगितले होते.
त्यानुसार महाराष्ट्र शासन पर्यटन व सांस्कृतिक विभाग निर्णयानुसार महाबळेश्वर हे आता ‘ब’ वर्ग पर्यटनस्थळ घोषित करण्यात आले आहे. यामुळे स्थानिक जनतेला नवीन रोजगाराच्या संधी व महाबळेश्वरच्या विकासाला मोठी चालना मिळणार असून भरघोस निधी उपलब्ध होणार आहे. याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, महाबळेश्वर तालुक्याचे सुपुत्र नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे, सातार्याचे जिल्हाधिकारी शेखर सिंह, पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते, महाबळेश्वर नगरपरिषदेचे नगरसेवक, मुख्याधिकारी व कर्मचारी यांचे सहकार्य लाभले.