मुंबई : कोणत्याही आजारात रुग्ण पहिल्यांदा फॅमिली डॉक्टरशी संपर्क साधतो. त्यामुळे त्यांनीच पुढाकार घेत ‘माझा डॉक्टर’ बनून सर्वसामान्य रुग्णांना मार्गदर्शन केल्यास सुरुवातीच्या टप्प्यातच कोरोनाची तिसरी लाट रोखण्यात मोठी मदत होईल, अशी अपेक्षा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केली.
व्हिडिओ काॅन्फरन्सद्वारे मुख्यमंत्र्यांनी रविवारी मुंबईतील ७०० खासगी डॉक्टरांशी संवाद साधला व सर्व डाॅक्टरांना कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा मुकाबला करण्यासाठी सज्ज राहण्यास सांगितले. घरीच विलगीकरणात असलेल्या रुग्णांची डाॅक्टरांनी विचारपूस करीत राहणे गरजेचे आहे. त्यांना प्रोटोकॉलप्रमाणे उपचार मिळतात का याकडे व्यक्तिश: लक्ष द्यावे तसेच वॉर्ड अधिकाऱ्यांनाही माहिती वेळोवेळी दिल्यास रुग्णांच्या बाबतीत व्यवस्थापन करणे पालिकेला सोपे जाईल, असे ते म्हणाले.
लहान मुलांकडे लक्ष ठेवा
– राज्यात बालरोगतज्ज्ञांची एक टास्क फोर्स निर्माण करण्यात येत आहे. याविषयी या सभेत माहिती देण्यात आली.
– लहान मुलांना होणारी सर्दी, ताप, डायरिया, दूध व अन्न खाणे कमी करणे किंवा बंद होणे अशा लक्षणांकडे लक्ष देणे गरजेचे आहे, असेही यावेळी सांगण्यात आले.
यावेळी आरोग्य विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव डॉ. प्रदीप व्यास, टास्क फोर्सचे डॉ. संजय ओक, डॉ. शशांक जोशी, डॉ. राहुल पंडित, डॉ. तात्याराव लहाने यांनी कोरोनाकाळातील उपचार पद्धतीवर डॉक्टर्सना मार्गदर्शन केले.