तुर्तास जावई शोध घेताना तिन्ही पक्षातल्या किती जणांना ईडी कार्यालयाच्या फेऱ्या माराव्या लागणार हे त्यांना त्यांच्या जावयांच्याच कडूनच समजेल. वा ईडी अनेकांच्या जाव्याचे शोध लावतील.तूर्तास एवढेच.!
.
मधुसूदन पतकी
जावई शोध घेताना तिन्ही पक्षातल्या किती जणांना ईडी कार्यालयाच्या फेऱ्या माराव्या लागणार हे त्यांना त्यांच्या जावयांच्याच कडूनच समजेल. वा ईडी अनेकांच्या जावयांचे शोध लावतील.
तूर्तास एवढेच.!
सध्या दररोज एखादा राजकीय नेता तपास यंत्रणेच्या ताब्यात किंवा कार्यालयात चौकशीसाठी आणला जातोय. उच्च न्यायालय, सर्वोच्च न्यायालयात ही नेते मंडळी या विरोधात दाद मागतात.तीन , तीन समन्स पाठवून या मंडळींना तपास यंत्रणा बोलवतात. ही मंडळी, आम्ही तपास यंत्रणांना चौकशीत सहकार्य करणार असेही सांगतात. (अन्यथा ही मंडळी काय करू शकतात असा प्रश्न माझ्या मनात नेहमीच येतो) आणि दुसरीकडे हे राजकीय षडयंत्र आहे. ईडी, आयटी, सीबीआय राजकारणासाठी केंद्र सरकार वापरत आहे असेही आरोप करतात.आता हा प्रकार चूक आहे तसाच तो बरोबर असू शकतो. आणि या दोन्ही परिस्थितीची शक्यता आग असल्याशिवाय धूर निघत नाही या तात्विक पायावरच आधारित आहेत हे नक्की.
आमदार अनिल देशमुख, माजी आमदार एकनाथ खडसे, सध्याचे उपमुख्यमंत्री नामदार अजित पवार, आमदार प्रताप सरनाईक ही ईडीच्या रडावारची ठळक नावे. बरं ज्यांच्या तक्रारीवरून ही प्रकरणे सुरु झाली ते तक्रारदार आणि जबाब देणारे कोण आहेत? तर आजच्या सत्तारूढ पक्षांनी ज्यांना एकेकाळी डोक्यावर घेतले होते, (उदा. अंजली दमानिया )अशीच मंडळी यात प्रामुख्याने दिसतात. आज यांच्यावर आरोप झालेत(अडकलेली मंडळी )त्यांनाच वाचवण्यासाठी,डोक्यावर घेण्यासाठी आता सत्तेततली मंडळी, राज्यकर्ते इच्छुक आहेत. ज्यांनी जबाब, तक्रारी नोंदवल्या(उदा. दमानिया, सिंग, वाझे, डॉ. पाटील ) यांना आता टीकेचे लक्ष्य केले जात आहे.
कोण तारणार
गम्मत पहा श्री. एकनाथ खडसे भाजपत होते. एक ताकदवान नेता होते. त्यावेळी त्यांच्यावर जमीन घोटाळ्यांचे आरोप झाले. मूलतः घोटाळा शिवसेनेच्या ततकालीन उद्योग मंत्री सुभाष देसाई यांनी भाजपला कोपऱ्यात घेण्यासाठी काढला होता. त्यानंतर त्यात अंजली दमानिया व इतरांनी माहितीच्या अधिकाराखाली कागदपत्रे जमून दाद मागितली. या मंडळींना या प्रकरणात सहभागी करण्याचे राजकारण्यांचे प्रयत्न ही यशस्वी झाले असावेत. किंबहुना त्यांच्या केसमधील प्रवेशने झाले.याचे फलित एकनाथ खडसे पक्ष, प्रामाणिकपणा, प्रतिष्ठा, नेतृत्व, मुख्यमंत्रीपदाचे दावेदार या सगळ्यातून मागे फेकले गेले. श्री.खडसे यांनी आदळआपट केली. निवडणुकीसाठी पक्षाने न सांगता उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा अंकही रंगवला. श्री.फडणवीसांवर आरोप केले. मुलाखतीतून जहरी टीका करण्याची एकही संधी सोडली नाही. पण भाजपने त्यांना मुख्य प्रवाहात आणले नाही. अखेरीस श्री. खडसे राष्ट्रवादी काँग्रेसवासी झाले. आणि सीडी, ईडी यावर कोट्या करत टाळ्या मिळवल्या. त्यानंतर आपला सगळा प्रवास सहज सोपा असेल असा त्यांचा अंदाज होता. राष्ट्रवादीने पसरलेल्या रेड कार्पेटचा अंदाज त्यांना आला नाही. पक्षाध्यक्ष श्री.पवार आपले भले करतील आमदार, मंत्री करतील या भ्रमातून ईडीच्या चौकशीअंती ते बाहेर पडतील. अर्थात राष्ट्रवादीलाही या सगळ्या प्रकरणाची कल्पना असेल असे वाटत नाही. भारतीय जनता पक्षाला कोंडीत पकडणारा; विशेषता:श्री.फडणवीसांना नडणारा, भाजपा संस्कृतीतलाच एक योद्धा आपल्याला मिळाला, गाजराची पुंगी वाजली तर छान नाहीतर मोडून टाकून देता येईल या हिशोबानेच कदाचित त्यांचा राष्ट्रवादीत प्रवेश करून घेतला असावा अशी ही शक्यता आहे.
महत्वाकांक्षा भोवली
भाजप सत्तेवर असतानाच श्री.खडसे यांच्या जमीन घोटाळा याचे गांभीर्य ओळखून श्री. फडणीस यांनी त्यांचा राजीनामा घेतला. एकीकडे पक्षाच्या प्रतिष्ठेचा आलेख वाढवला आणि वैयक्तिक पातळीवर प्रतिस्पर्धी हटवला. प्रकरण थंड बस्त्यात ठेवून श्री. खडसे यांची राजकीय घुसमट ही केली. पण अशावेळी घरातील इतर लेक, सुन खासदार,जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्षा आणि बगलबच्च्यांना जिल्हा परिषद, महापालिकेवर रखवालदार म्हणून ठेवले असताना श्री. खडसे यांना सत्तेच्या केंद्रस्थानी यायचे होते. चूक त्यांची नाही. महत्वाकांक्षा पण असते.पण वेळ प्रतिकूल असताना शांत बसून राहणे आवश्यक होते. भाजपतील एकूण घटनाक्रम पाहता श्री.एकनाथ खडसे सुटतील असेच त्यांना अडचणीत अडकवले जात होते. श्रीमती दमानिया यांचाही असाच आरोप आज रोजी आहे. पण राष्ट्रवादीने दाखवलेल्या स्वप्नांमध्ये श्री. खडसे कदाचित अडकले असावे. अर्थात हे स्वप्न,स्वप्न नव्हतेच आणि श्री. खडसे यांना महा आघाडी सरकारच्या ताकतीचा अंदाज न आल्याने ते त्यांच्या अप्राप्य स्वप्नात रूपांतरित झाले. आता प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि राष्ट्रवादी, काँग्रेस यांनी त्यावेळी केलेल्या श्री. खडसेंवरच्या आरोपांना बाजूला ठेवत आता त्यांची बाजू घ्यावी लागत आहे. एकेकाळी श्री. खडसे घोटाळ्यात सापडले याचा आनंद या मंडळींना झाला होता. आज तो आनंद त्यांना श्री. खडसे यांच्या सहानुभूतीमध्ये परावर्तित करावा लागत आहे.
घोटाळा नक्की कोणाचा.?
गुंता हा आहे की, राज्य सरकार श्री. खडसे यांना सोडवू शकत नाही. केवळ स्वतःच नाही तर त्यांच्या पत्नी आणि जावई या जमीन प्रकरणात गुंतले आहेत. खरे तर या जमिनीसंदर्भात बँकेत झालेली देवाण घेवाण पत्नी व जावई त्यांच्या खात्यातून झाली आहे. (जमिनीची किंमत 240/-₹ असल्याचा दमानिया यांचा दावा आहे.) अशा परिस्थितीत राज्य सरकार आणि त्यातले पक्ष कोरडी सहानुभूती दाखवण्यापेक्षा आणि केंद्र सरकारला नावे ठेवण्यापेक्षा अधिक काही करू शकत नाहीत. भाजपच्या या ताकदीचा अंदाज महाविकास आघाडीला आला नाही. आणि आल्यानंतर नावे ठेवण्यापेक्षा अधिक काही ते करू शकत नाही.श्री. खडसे दोषी नाहीत तर पत्नी, जावई दोषी आहेत असे दिसते. म्हणजे भाजप नाही, राष्ट्रवादी नाही, पत्नी नाही आणि मुलगी -जावई सोबत नाही अशी अवस्था श्री. खडसे यांच्यावर यायची. अखेर जर घोटाळा झाला असेल तर तो त्यांना स्वतः च्या शिरावर घ्यावा लागेल.
भूखंड प्रकरण सेनेचे
दुसरा मुद्दा असा की श्री.सुभाष देसाई तसेच शिवसेना या प्रकरणाबाबत गप्प आहे. खा.संजय राऊत चौकशी यंत्रणांवर बोलतात त्यावर कोण आहे गांभीर्याने विचार करत नाही.केंद्र सरकारला त्यांच्या टीकाटिपणीने फरक पडत नाही. आता श्री.खडसे प्रकरण सुरू केले ते शिवसेनेने. पण आता ते थांबवणे त्यांच्या हातात नाही. युतीच्या काळात सेना-भाजप सत्तेत होते. तेव्हा या प्रकरणाची तडजोड करणे शक्य झाले असते.आता खडसे हे राष्ट्रवादीत आहेत. त्यांनी किमान शिवसेनेत जाण्याचे चातुर्य दाखवले पाहिजे होते. पण श्री. खडसे राष्ट्रवादीत जाऊन पुन्हा एकदा चुकीचा डाव खेळले. उद्या, समजा सेना-भाजप एकत्र आले, तर राष्ट्रवादीतल्या श्री.खडसे यांना या प्रकरणाची सेनेकडे दाद मागायला किंचितही ही जागा राहणार नाही.त्यावेळी विरोधात असलेल्या राष्ट्रवादीकडे आणि श्री. खडसे यांच्याकडे पुन्हा एकदा भाजपवर टीका करण्यापलीकडे हातात शिल्लक काही असणार नाही. तरी बरं खा. रक्षा खडसे या तंतुने श्री. खडसे यांनी भाजपला जोडून ठेवले आहे. (शेवटी तुटत्याला तंतुचा आधार)या प्रकरणात राज्यपाल श्री.भगतसिंह कोशारी यांच्याकडे आमदार म्हणून नियुक्तीसाठी गेलेल्या 12 नावानंपैकी श्री. खडसे यांच्या नावावर फुली बसली तर नवल वाटायला नको.
मौके पे चौका
तिसरा महत्त्वाचा मुद्दा.आघाडीचे कर्तेधर्ते राष्ट्रवादीचे अध्यक्ष श्री. शरद पवार यांच्यापासून उर्वरित दोन्ही पक्षांचे नेते; केंद्र सरकार,भाजप तपासी यंत्रणांचा गैरवापर करत असल्याचा आरोप करत आहेत. मात्र हेच नव्हे तर डॉक्टर श्रीमती शालिनीताई पाटील आणि इतर तिघांनी इकडे केलेल्या तक्रारीमुळे सहकारी साखर कारखान्यांच्या घोटाळ्यांचे प्रकरण सुरू झाले आहे हे ते विसरत आहेत.श्रीमती पाटील मुळात काँग्रेसच्या आणि नंतर जरंडेश्वर कारखान्याच्या उभारणीसाठी शिवसेनेकडे झुकलेल्या ज्येष्ठ नेत्या.कारखाना शिखर बँकेनी लिलावात काढल्यावर त्यांनी कोर्टकचेरी केली.ईडीकडे तक्रार नोंदवली. हे सत्य आहे. आता कारखाना आत्ताच का जप्त केला याची बाजू आरोपी-फिर्यादी दोघेही आपापल्या बाजूने मांडू शकतील. पण इंडिकडे तक्रार आल्यावरच तपास सुरु झाला.
तीच बाब आ. अनिल देशमुख यांची आहे. वाझे,सिंग ही सत्तारूढ मंडळींनीच पोलीस खात्यात नेलेली मंडळी. त्यांचे जबाब, फिर्यादीचे म्हणणे यामुळेच प्रकरण ईडीकडे गेले.यात केंद्र सरकारचा थेट कसा आला हे समजत नाही.आणि समजतो ही.! आता हातात आलेली, विरोधकांना चेपायची आयती संधी भाजप कशी सोडेल. मौकेपे चौका ठोकणारचकी.!
जावईशोध घेताना तिन्ही पक्षातल्या किती जणांना ईडी कार्यालयाच्या फेऱ्या माराव्या लागणार हे त्यांना त्यांच्या जावयांच्याच कडूनच समजेल. वा ईडी अनेकांच्या जावयांचे शोध लावतील.
तूर्तास एवढेच.!
.
मधुसूदन पतकी