पाटण : पाटणची माती आणि कोयना तीर हा अतिशय दैदिप्यमान आहे. या मातीत होत असलेल्या साहित्यसंमेलनातून एखादा साहित्यिक, कवी घडू शकतो. पाटणच्या भूमीला साहित्याची परंपरा लाभलेली आले. या भूमीने अनेक कथा मला दिल्या आहेत. शेतकरी, सर्वसामान्यांनी आपल्या व्यथा लेखणीतून मांडल्या तर ते साहित्य होते. ज्यावेळी तुम्ही लेखनातून स्वतः व्यक्त होता तेच साहित्य खरे अजरामर होते, असे प्रतिपादन जेष्ठ ग्रामीण कथा, कादंबरी व नाट्य लेखक जगन्नाथ शिंदे यांनी केले.कोरोना पार्श्वभूमीवर यावर्षी शासनाचे नियम पाळून टेकावरचा वाडा येथे साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. प्रथम सत्रात स्वा. सै. बाळासाहेब उर्फ भाई भडकबाबा पाटणकर यांच्या प्रतिमेचे पूजन, ग्रंथ आणि सरस्वती पूजनाने संमेलनाची सुरुवात करण्यात आली. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते.
अध्यक्षस्थानी पुणे येथील पर्यावरण व शेती शास्त्रज्ञ डॉ. सोमनाथ पाटणकर, रयत शिक्षण संस्था सातारचे जनरल सदस्य जयवंतराव पाटील, स्वागताध्यक्ष विक्रमबाबा पाटणकर यांची प्रमुख उपस्थिती होती. जेष्ठ साहित्यिक शंकर सारडा, गजलकार इलाही जमादार यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. जगन्नाथ शिंदे पुढे म्हणाले, गुलाल आणि अभिरापेक्षा मोठी इथली माती आहे पाटणच्या मातीत कितीतरी आदर्श आहेत. दोन हजारहून जास्त वय असणारी आपली मराठी भाषा आहे. लेखण कौशल्य येण्यापूर्वीपासून बोलीभाषेत मराठी रुजली होती. लोकांनी आपल्या वेदना लिहायला सुरवात केली तेव्हा साहित्य जन्माला आले. कथा कादंबर्यांमध्ये लोकांच्या भावना एकटवलेल्या असतात. तुम्ही लिहायला शिका. जेव्हा लिहायला लागाल तेव्हा व्यक्त व्हाल. डोंगरासारखी माणसं तुम्ही आहात आणि आभाळाएवढं प्रेम ही तुमच्याकडे आहे. या साहित्य संमेलनातुन एखादा साहित्यिक घडावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
सोमनाथ पाटणकर म्हणाले, आज शेतीमध्ये नवनविन प्रयोग झाले पाहिजेत. संशोधनात तळागळामध्ये पोहचणारे संशोधक नाहीत. हरित क्रांतीचा सर्वांनी फायदा घेतला मात्र त्याचा तोटा आपण लक्षात घेतला नाही. आमच्या मातीमध्ये निरनिराळे गुणधर्म आहेत. आपल्या ग्रामिण भागातील नैसर्गिक साधनसंपत्ती एकत्रित करुन त्याची विक्री मोठ्या प्रमाणात पुण्या-मुंबईत होत आहे. नविन महाबळेश्वर प्रकल्पाने अनेकांना रोजगार उपलब्ध होणार आहे. पाटण तालुका हा संपन्न व समृद्ध आहे. पाटण तालुक्याचा वारसा टिकवून पाटण तालुक्यात हरित क्रांती करायची आहे. आम्ही संशोधन करु नवनविन प्रयोग करु शकतो परंतू साहित्य रुपात ते लोकांपर्यंत पोहचवण्याचे काम एक साहित्यिकचं करु शकतो.अध्यक्षस्थानावरून बोलताना कवी जयवंतराव पाटील म्हणाले, भडकबाबांनी आपले विचार कठोरपणे मांडले.
त्यांचे विचार आत्मसात करावेत. आपला तालुका मागासलेला आहे. तीन चार खोऱ्यात तालुका विखुरला आहे. येथे जास्त शेती उत्पादन निघत नाही. येथील लोकांना डोंगरातील विपुल निसर्गसंपदेची माहिती नाही. मार्केटिंग करता येत नाही, हे मागासलेपण दूर करण्याचे काम साहित्य करते आणि ते काम बाबांनी केले आहे. कवी यशवंत, कवी विहंग या मातीने दिले त्यांचे स्मरण होणे गरजेचे आहे. साहित्य समेलनामुळे ग्रामीण जनतेला व्यसपीठ मिळाले आहे. साहित्य आणि पुस्तक मिळाले. साहित्यातुन संशोधन करता आले पाहिजे. साहित्याची जोड देऊन शेती सुधारणा करता आली पाहिजे.
साहित्यातून नवसमाज निर्मिती होऊ शकते. शेतकर्यांनी पारंपरिक शेतीतून आधुनिक शेतीकडे वळावे, असे आवाहन त्यांनी केले.प्रास्ताविकात विक्रमबाबा पाटणकर म्हणाले, ग्रामीण भागातील लोकांना साहित्य मिळाले पाहिजे. पुस्तकाचे वाचन झाले पाहिजे. शेतकऱ्यांना मार्गदर्शन मिळावे. वाचन चळवळ वाढीस लागावी हा संमेलनाचा मुख्य हेतू आहे. ग्रामीण भागातील साहित्यिक शोधण्याचे काम समेलनातून होत आहे. आपली संस्कृती साहित्यिकांमुळे टिकली आहे. यातून समाज निर्मितीचे काम होत आहे.सुत्रसंचलन व मान्यवरांचे परिचय ग्रंथप्रेमी संजय इंगवले यांनी केले. विक्रमबाबा पाटणकर यांनी स्वागत केले. करणसिंह पाटणकर यांनी आभार मानले. संमेलनास दिलीपराव मोटे, ए. व्ही. देशपांडे, संजय पाटील, अरुण खांडके, गोरख नारकर, फत्तेसिंह पाटणकर, शंकरराव कुंभार, सौरभ देशपांडे, डॉ. विद्या पाटील, डॉ. वीणा नांगरे, प्रा. विजया म्हासुरणेकर, अनिल बोधे, खाशाबा चव्हाण, नाना पवार, सोमनाथ आग्रे, क्रांतिसिंह पाटणकर यांच्यासह ग्रंथप्रेमी, साहित्यिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.






















