सातारा : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्याच्या अनुषंगाने सातारा जिल्ह्यात छत्रपती शिवाजी महाराज जयंती साध्या पद्धतीने व शासनाने वेळोवेळी दिलेल्या नियमांचे तसेच सोशल डिस्टन्सिंगचे पालन करुन साजरी करणे आवश्यक असल्याने जिल्हादंडाधिकारी तथा जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी 19 फेब्रुवारी रोजीच्या 0.00 ते 24.00 वाजेपर्यंत क्रिमिनल प्रोसिजर कोड 1973 चे कलम 144 कलम आदेशान्वये जारी केले आहे.
या आदेशानुसार छत्रपती शिवाजी महाराजंचा जन्म 19 फेब्रुवारी 1630 रोजी शिवनेरीवर झाला होता. त्यामुळे अनेक शिवप्रेमी किल्ला शिवनेरी अथवा गड, किल्ल्यांवर जाऊन तारखेनुसार 18 फेब्रुवारी रोजीच्या मध्यरात्री 12 वाजता देखील एकत्र येऊन शिवजयंती साजरी करतात, परंतु या वर्षी कोविड-19 चा प्रादुर्भाव टाळण्यासाठी मोठ्या प्रमाणात एकत्र न येता साधेपणाने शिवजयंती उत्सव साजरा करावा.
दरवर्षी शिवजयंती साजरी करताना संपूर्ण महाराष्ट्रात विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते, परंतु या वर्षी कोणत्याही प्रकारचे सार्वजनिक ठिकाणी पोवाडे, व्याख्यान, गाणे, नाटक इत्यादींचे सादीकरण अथवा इतर सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येऊ नये. कोणत्याही प्रकारे प्रभात फेरी, बाईक रॅली, मिरवणुका काढण्यात येऊ नयेत. त्याऐवजी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अथवा प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्याचा कार्यक्रम आयोजित करुन त्या ठिकाणी सोशल डिस्टन्सींगचे पालन करुन फक्त 100 व्यक्तींच्या उपस्थितीत शिवजयंती साजरी करण्याची परवानगी देण्यात येत आहे.
शिवजयंतीच्या दिवशी आरोग्य विषयक उपक्रम/शिबीरे (उदा. रक्तदान) आयोजित करण्यास प्राधान्य देण्यात यावे आणि त्याद्वारे कोरोना, मलेरिया, डेंग्यू इत्यादी आजार आणि त्याचे प्रतिबंधात्मक उपाय तसेच स्वच्छता याबाबत जनजागृती करण्यात यावी. आरोग्य विषयक उपक्रमांचे आयोजन करताना त्या ठिकाणी सोशल डिस्टींग तसेच स्वच्छतेचे नियम (मास्क, सॅनिटायझर इत्यादी) पाळण्याकडे विशेष लक्ष देण्यात यावे. फटाक्यांची आतिषबाजी करण्यात येऊ नये. ध्वनीप्रदूषणाच्या अनुषंगाने नियमांचे कोटेकोरपणे पालन व्हावे. तसेच कोविड-19 च्या विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाच्या मदत व पुनर्वसन, आरोग्य, पर्यावरण, वैद्यकीय शिक्षण विभाग तसेच संबंधित महानगरपालिका, पोलीस प्रशासन, स्थानिक प्रशासन यांनी विहित केलेल्या निमयांचे काटेकोरपणे अनुपालन करणे बंधनकारक आहे, असेही जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी शेखर सिंह यांनी आदेशात नमुद केले आहे