महाराष्ट्र न्यूज प्रतिनिधी / सातारा : लोणंद-निरा रोडवर पाडेगाव जवळ भवानीमाता मंदिराजवळच्या तीव्र उतारावर दोन डंपरमधे झालेल्या भीषण अपघात एका डंपर चालकाचा जागीच मृत्यू झाला असून दोघे जखमी झाले आहेत.
दिनांक १६ रोजी पहाटे साडेपाचच्या सुमारास लोणंद कडून निरेच्या दिशेने चाललेल्या भरधाव डंपर क्रमांक एमएच ११ सीएच ०४६१ याने निरा दिशेकडून लोणंदच्या दिशेने चाललेल्या विनानंबर डंपरला रस्त्याच्या विरुद्ध दिशेला जाऊन दिलेल्या जोरदार धडकेत समोरचा डंपर चालक सुनील तुकाराम पवार रा. इंदिरा नगर,सातारा हा जागीच ठार झाला तर त्याचा सोबत असलेला आकाश नलवडे हा जखमी झाला. तर टक्कर देणारा चालक उपेंद्र गुप्ता हा सुद्धा गंभीररित्या जखमी झाल्याने त्याला लोणंद येथील खाजगी दवाखान्यात दाखल करण्यात आले आहे. ही धडक एवढी जोरात होती की दोन्ही गाड्या एकमेकांत अडकल्याने गंभीर जखमी उपेंद्र गुप्ताला बाहेर काढण्यासाठी तासभर प्रयत्न करावा लागला.
लोणंद पोलिस स्टेशनचे सपोनि संतोष चौधरी, एएसआय वाघमारे, अभिजीत घनवट, महेश सपकाळ, संंजय जाधव यांनी तातडीने वाहतूक सुरळीत करून जखमींना उपचारासाठी दाखल केले. या प्रकरणी डंपर चालक उपेंद्र गुप्ता याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी लोणंद पोलिस ठाण्याचे सपोनि संतोष चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली पो.हे.काॅ. अविनाश नलावडे पुढील कार्यवाही करत आहेत.
































