आसनगावच्या सरपंचांनी ग्रामसभेत खोटी माहिती देत केली दिशाभूल; सरपंचांवर गुन्हा दाखल करण्याची ग्रामस्थांची मागणी
सातारा : सातारा तालुक्यातील आसनगाव येथे सोमवार दिनांक 18/08/2025 रोजी झालेल्या ग्रामसभेत चक्क सभेचे अध्यक्ष असलेल्या सरपंच श्री. विनोद चंद्रकांत गायकवाड यांनीच ग्रामसभेत खोटी माहिती देत गावाची व प्रशासनाची दिशाभूल केल्याने ग्रामसभेत गदारोळ झाला. सरपंच पदाचा लाभ घेण्यासाठी विनोद गायकवाड यांनी मला तिसरे अपत्य झाले नसल्याची खोटी माहिती ग्रामसभेत दिली. त्यामुळे सरपंच पदाच्या खुर्चीसाठी विनोद गायकवाड यांनी स्वतःच्या मुलाला नाकारल्याची चर्चा गावात आणि पंचक्रोशीत सुरु आहे. त्यामुळे तिसरे अपत्य होऊन देखील नैतिकता न ठेवता केवळ खुर्चीसाठी प्रशासनाची व गावाची दिशाभूल करणाऱ्या सरपंच विनोद गायकवाड यांना तात्काळ सरपंच पदावरून अपात्र करून त्यांनी प्रशासनाची दिशाभूल करून ग्रामसभेत खोटी माहिती दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल करून कारवाई करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
आसनगावचे सरपंच विनोद गायकवाड हे 2022-2023 मध्ये सार्वत्रिक निवडणुकीत लोकनियुक्त सरपंच म्हणून निवडून आले होते. त्यावेळी त्यांना दोन अपत्य होते. मात्र सरपंच विनोद गायकवाड यांना दिनांक 28 फेब्रुवारी 2025 रोजी कै. ह. भ. प. प्रभाकर मल्हारराव कुटे स्मृती रुग्णालय, आकुर्डी पुणे, (पिंपरी चिंचवड महानगर पालिका पिंपरी – 18) येथील हॉस्पिटलमध्ये तिसरे अपत्य झाल्याने ते सरपंच पदावर कार्यरत राहण्यास अपात्र आहेत असे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. नैतिकतेच्या आधारे व पदाची जबाबदारी राखत त्यांनी राजीनामा देणे गरजेचे होते. मात्र असे असताना देखील केवळ सत्तेच्या हव्यासापोटी त्यांनी पदाचा राजीनामा दिला नसल्याने त्यांना अपात्र करावे अशी मागणी ग्रामस्थांनी सातारा जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे. याप्रकरणाची चौकशी सुरु असतानाच त्यांनी स्वातंत्र्यदिनी ध्वजारोहण करुन राष्ट्रीय ध्वजाचा देखील त्यांनी अपमान केला आहे. त्यातच सोमवारी झालेल्या ग्रामसभेत ग्रामस्थांनी त्यांना तिसऱ्या अपत्याविषयी विचारणा केली असता त्यांनी मला तिसरे अपत्य झाले नाही, अशी खोटी माहिती ग्रामसभेत देऊन त्यांनी गावाची व प्रशासनाची दिशाभूल केली असून त्यांना तत्काळ सरपंच पदावरून अपात्र करून त्यांनी प्रशासनाची दिशाभूल करून पदाचा लाभ घेतल्याप्रकरणी गुन्हा दाखल करून कारवाई करावी, अशी संतप्त मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
ग्रामसभेत खोटी माहिती देणे हा गुन्हा
ग्रामसभेत खोटी माहिती देणाऱ्यावर भारतीय दंड संहिता कलम १७७ आणि १८१ अंतर्गत गुन्हा दाखल होऊन त्याला शिक्षा होऊ शकते. अशी कायद्यात तरतूद आहे. आसनगावचे सरपंच विनोद गायकवाड यांनी चक्क ग्रामसभेचे अध्यक्ष असून देखील स्वतःच ग्रामसभेत तिसरे अपत्य नसल्याची खोटी माहिती देऊन गावाची दिशाभूल करून विश्वासघात केला आहे. त्यामुळे त्यांच्यावर याच कलमांतर्गत गुन्हा दाखल करणार असल्याची माहिती देखील ग्रामस्थांनी दिली आहे.
‘त्या’ व्यक्तीवरही गुन्हा दाखल करावा
ग्रामसभा चालू असताना ग्रामस्थांनी सरपंचांना तिसरे अपत्य प्रकरणावरुन फैलावर घेतल्यानंतर गोंधळलेल्या सरपंच विनोद गायकवाड यांनी सभेतून बाहेर जात अज्ञात व्यक्तीबरोबर मोबाईलवरुन कॉन्टॅक्ट केल्यानंतर त्याने सांगितल्याप्रमाणे ग्रामसभेत येऊन खोटी माहिती दिली. त्यामुळे सरपंच विनोद गायकवाड यांना कंट्रोल करणाऱ्या त्या रिमोटवर (व्यक्तीवर) देखील फसवणुकीचा गुन्हा दाखल करावा, वेळप्रसंगी विनोद गायकवाड यांचे कॉल डिटेल्स काढा, बाकी पुरावे आम्ही न्यायालयात सादर करु, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.






























