पाणी प्रश्न पेटण्याची चिन्हे
महाराष्ट्र न्यूज पाटण प्रतिनिधी : डफळवाडी येथील धुळाराम शिंदे व कुटुंबिय नैसर्गिक सार्वजनिक पिण्याचे व शेतीचे पाणी बेकायदेशीर बळकावण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळे डफळवाडी गावातील शेतकऱ्यांवर उपासमारीची वेळ येणार आहे. याबाबत ग्रामस्थांनी 12 फेब्रुवारी 2021 रोजी शासनाला निवेदन दिले होते. मात्र अद्याप कोणतीच कारवाई झाली नाही. याविरोधात डफळवाडी गावातील धनगर समाजातील शेतकरी व ग्रामस्थांनी मंगळवार दि. 23 पासून बेमुदत साखळी उपोषण करणार असल्याचा इशारा पाटण येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना दिला आहे.
याबाबतचे निवेदन त्यांनी मुख्यमंत्री, गृहराज्यमंत्री, जिल्हाधिकारी सातारा, पोलीस निरीक्षक पाटण, ग्रामपंचायत मणदुरे व तहसीलदार पाटण यांना दिले आहे.
याबाबत माहिती देताना पुढे म्हटले आहे, मणदुरे (डफळवाडी) येथील धुळाराम शिंदे व त्यांचे कुटुंब आमच्या पुर्वजांच्या व आमच्या हक्काचे नैसर्गिक सार्वजनिक पिण्याचे व शेतीचे पाणी दुष्ट हेतुने बळकावून आमचे परंपरेने चालत आलेले पिण्याचे व शेतीचे पाणी बंद करण्याचे कुटील षड्यंत्र रचत असल्याने आमची बारमाही बागायत शेती पाण्याविना कोरडी होवून पिकांविना पडून राहणार असल्याने आमच्या सर्व शेतकरी कुटुंबावर उपासमारीची वेळ येणार आहे. या नैसर्गिक पाण्यावर शासनाने 30 वर्षापूर्वी नळ पाणीपुरवठा योजना केली असताना धुळाराम शिंदे कोर्टाच्या निर्णयाचा गैरवापर तसेच दिशाभूल करून लोकांना व शेतकऱ्यांना वेठीस धरत आहेत. आमच्या हक्काचे पाणी बळकावून घेतले तर आमची बायका-पोरं व गुरा-ढोरांवर पाण्याविना मोठे हाल होणार आहेत.
धुळाराम शिंदे व अन्य काहीजण आंदोलनाच्या नावाखाली विविध हातखंडे वापरून धनगर समाजावर दबाव टाकून धनगर विरूध्द कुणबी अशी अंतर्गत जातीय तेढ निर्माण करून गावातील सामाजिक ऐक्य बिघडवून त्या अडून आमच्या हक्काचे पाणी बळकावण्याचा प्रयत्न करत आहेत. आमच्या अल्पवयीन मुलांवर व तरूणांवर पोलिसांवर दबाव टाकून महिलांना पुढे करून खोटे फौजदारी गुन्हे दाखल करून आमच्या मुलांचे भविष्य अंध:कारमय केले आहे. शांताबाई सपकाळ ही वृध्द महिला हक्काचे पाणी चोखळण्यासाठी गेली असता समाज कंटकांनी मारहाण व शिवीगाळ केली. या समाज कंटकावर दखल पात्र फौजदारी गुन्हे दाखल करावे. यासाठी मंगळवार दि. 23 रोजी पासून मणदुरे (डफळवाडी) येथे आम्ही धनगर समाजातील शेतकरी व गावातील इतर सर्व शेतकरी व ग्रामस्थ साखळी उपोषण करत आहोत.
पत्रकार परिषदेस राजेंद्र शिंदे, आत्माराम सपकाळ, भैरू शिंदे, रामचंद्र शेळके, निलेश शिंदे आदी उपस्थित हेते. तर निवेदनावर बाबुराव ठकू शिंदे, भैरू संभाजी झोरे, निलेश पांडुरंग शिंदे, रामचंद्र बाबुराव शेळके, कोंडिबा धाकू झोरे यांच्यासह सुमारे 75 शेतकऱ्यांच्या निवेदनावर सह्या आहेत.